मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेला नागपूरचा 'डॉली चायवाला' (Dolly Chaiwala) आता उद्योजक बनला आहे. आपली अनोखी चहा बनवण्याची शैली आणि रंगीबेरंगी पेहरावासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनील पाटील उर्फ डॉली चायवालाने नागपूर शहरात आपले पहिले अधिकृत फ्रँचायझी आउटलेट (Franchise Outlet) सुरू केले आहे. या नवीन उपक्रमामुळे डॉलीच्या व्यवसायाचा आता विस्तार झाला असून, त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
फ्रँचायझी आउटलेटचे उद्घाटन
नुकताच डॉली चायवालाच्या या नवीन आउटलेटच्या उद्घाटनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये डॉली त्याच्या नेहमीच्या शैलीत चहा तयार करताना आणि ग्राहकांशी संवाद साधताना दिसत आहे. नागपूरच्या एका गजबजलेल्या भागात हे आउटलेट सुरू करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी चहाचा आस्वाद घेण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती.
View this post on Instagram
सोशल मीडिया ते जागतिक ओळख
सुनील पाटील यांची ओळख केवळ नागपूरपुरती मर्यादित राहिलेली नाही. बिल गेट्स यांच्यासारख्या जागतिक व्यक्तिमत्त्वाने त्यांच्या टपरीवर चहा घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीचा फायदा घेत त्याने आता आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग करून फ्रँचायझी मॉडेलवर काम करण्यास सुरुवात केली आहे.