Asaduddin Owaisi (Photo Credit - Twitter)

मुंबई: ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) निवडणुकीत मुंब्रा प्रभागात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळाले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने मुंब्र्यातील ६ जागांवर विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या भागात एमआयएमने मिळवलेले यश हे प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

एमआयएमची दमदार कामगिरी

मुंब्रा आणि कळवा पट्ट्यात यंदा एमआयएमने आक्रमक प्रचार केला होता. स्थानिक प्रश्नांना वाचा फोडत तरुणांना आकर्षित करण्यात पक्षाला यश आले. आज जाहीर झालेल्या निकालांनुसार, मुंब्र्यातील विविध प्रभागांमधून एमआयएमचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे ठाणे महानगरपालिकेत पक्षाची ताकद वाढणार असून, विरोधी पक्षाची भूमिका बजावताना एमआयएमचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येईल.

मुंब्रा विजयी उमेदवाराचे नाव (MIM)

सैफ पठान (MIM)

सहर शेख (MIM)

शोएब डोंगरे (MIM)

नफीस अंसारी  (MIM)

अब्दुल मन्नान  (MIM)

करीम खान (MIM)

विरोधकांना धक्का

मुंब्रा हा प्रामुख्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, एमआयएमने ६ जागा खिशात घातल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला काही प्रमाणात तडा गेला आहे. तसेच, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसच्या उमेदवारांनाही या भागात कडवे आव्हान मिळाले. मतदारांनी प्रस्थापित चेहऱ्यांऐवजी एमआयएमच्या नव्या आणि स्थानिक उमेदवारांवर विश्वास दर्शवल्याचे दिसून येत आहे.