मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मुंबईत भारतीय जनता पक्षाचा महापौर बसण्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. "एकनाथ शिंदे यांनी 'जयचंदा'ची भूमिका बजावली नसती, तर भाजपला मुंबईवर आपला झेंडा फडकवता आला नसता," असा थेट आरोप त्यांनी शनिवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
'जयचंदगिरी'मुळे मराठी माणसाचा घात संजय राऊत यांनी इतिहासातील दाखले देत शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना महाराणा प्रतापांचा घात करणाऱ्या जयचंदाशी आणि शनिवारवाड्यावरचा जरीपटका उतरवून ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवणाऱ्या बाळाजी पंत नातूशी केली. "ज्यांनी आपल्या मराठी साम्राज्याचा घात केला, त्याच अवलादीचे हे लोक आहेत. या 'जयचंदगिरी'मुळेच आज मुंबईत महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसत आहे," असे राऊत यावेळी म्हणाले.
विरोधी पक्ष म्हणून प्रबळ संघर्ष देणार सत्ता हाती नसली तरी महापालिकेत विरोधक म्हणून शिवसेना (UBT), मनसे आणि काँग्रेस मिळून भाजपच्या नाकी नऊ आणतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, "सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात केवळ ३ ते ४ जागांचा फरक आहे. १०५ हून अधिक नगरसेवक विरोधी बाकावर आहेत. ही मोठी ताकद आहे. मुंबईला गौतम अदानींच्या घशात घालण्याचे किंवा ठेकेदारांचे राज्य आणण्याचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आम्ही छातीचा कोट करून मुंबईचे रक्षण करू."
ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्या युतीला अपेक्षित यश मिळाले नसल्याच्या प्रश्नावर राऊत यांनी स्पष्ट केले की, "अनेक ठिकाणी आमचे उमेदवार केवळ ५० ते २०० मतांच्या फरकाने पडले आहेत. राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. एका पराभवाने लढाई संपत नाही. सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून हे निकाल फिरवण्यात आले आहेत." आगामी काळातही ठाकरे बंधूंची युती कायम राहील आणि आम्ही एकत्र बसून पुढील रणनीती ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे एकनाथ शिंदे यांची राजकीय घसरण सुरू होईल. भाजपला त्यांची गरज आता संपली आहे," असा दावा त्यांनी केला. तसेच, अजित पवार पुन्हा स्वगृही परततील आणि शिंदे यांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.