IND vs WI 1st Test Day 2: जसप्रीत बुमराह याने इतिहास रचला, टीम इंडियासाठी 'ही' कामगिरी करणारा ठरला तिसरा सर्वात वेगवान गोलंदाज
जसप्रीत बुमराह (Photo Credit: @BCCI/Twitter)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) पहिल्या डावात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 297 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 189 धावांपर्यंत मजल मारता आली. याचबरोबर भारताने दुसऱ्या दिवसाखेर 108 धावांची आघाडी घेतली. भारताकडून ईशांत शर्मा याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी (Mohammed Shami), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जेसन होल्डर 10 धावांवर खेळत होता. तर मिगुएल कमिन्स त्याच्यासोबत मैदानात होता. विंडीजविरुद्ध पहिल्या डावात बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. (IND vs WI 1st Test: डेनिस लिली की जसप्रीत बुमराह? सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यानुसार हा आहे सर्वात धोकादायक गोलंदाज)

बुमराहने डॅरेन ब्राव्हो (Darren Bravo) याची विकेट घेतली आणि आपले नाव भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर नेले. ब्राव्होला बाद करताच बुमराहने अनेक आश्चर्यकारक विक्रमांची नोंद केली. बुमराह, भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 50 विकेट घेणारा तिसरा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला. बुमराहने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 11 व्या सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा ओलांडला. बुमराहच्या आधी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि व्यंकटेश प्रसाद यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेण्याची कामगिरी बजावली होती. दोघांनी 13 व्या कसोटी सामन्यात ही आश्चर्यकारक कामगिरी केली होती. आणि आता बुमराहने या दोघांना मागे सारत अवघ्या 11 सामन्यात 50 कसोटी विकेट्ससह यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. शिवाय, बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 50 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटच्या 2465 व्या चेंडूवर बुमराहने 50 वी विकेट घेतली. याआधी हा विक्रम भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या नावावर होता. अश्विनने 2597 व्या चेंडूवर 50 वी विकेट घेतली.

आपल्या या कामगिरीने बुमराह याने माजी क्रिकेटपटू नरेंद्र हिरवाणी (Narendra Hirwani) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांची बरोबरी साधली. हिरवाणी आणि भज्जी यांनी देखील 11 व्या टेस्ट सामन्यात 50 विकेट घेण्याची कामगिरी बजावली होती. तर, भारतासाठी सर्वात जलद 50 टेस्ट विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने 9 व्या सामन्यात हा पराक्रम केला होता.