
IND vs SA 1st T20I: गुरुवारी रात्री पहिल्या टी-20 सामन्यात भारताला (India) दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह पाहुण्या संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 211 धावसंख्येपर्यंत मजल मारली परंतु डेव्हिड मिलर आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांच्या झंझावाती खेळीमुळे भारताला टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक धावांचे लक्ष्य राखता आले नाही. ईशान किशन (76), श्रेयस अय्यर (36), ऋषभ पंत (29) आणि हार्दिक पंड्या (31) यांच्या खेळीने भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 12 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह झटपट खेळी खेळली, पण गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) त्याच्या एका कृतीवर नाराज दिसले. (IND vs SA Series 2022: पहिल्या T20 सामन्यात षटकारांचा पाऊस, 7 खेळाडूंनी मिळून रचला विश्वविक्रम)
झाले असे की भारताच्या डावातील शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हार्दिकने डीप मिड-विकेटच्या दिशेने शॉट खेळला, मात्र या चेंडूवर त्याने एकही धाव घेतली नाही. मात्र, त्यावेळी दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिक उपस्थित होता. आशिष नेहराने हार्दिकच्या कृतीवर गंमतीने सांगितले की, त्याने धाव घ्यायला पाहिजे होते कारण मी नसून दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिक होता. माजी भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “त्याने (हार्दिक पांड्या) शेवटच्या षटकात एक धाव घ्यायला हवी होती, तो दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिक होता आणि मी नाही.” याशिवाय आशिष नेहराने हार्दिक पांड्याच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला की हा अष्टपैलू खेळाडू कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि प्रत्येक भूमिका निभावण्याची क्षमता त्याच्यात आहे.
शिवाय, गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षकाने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी फिनिशरच्या भूमिकेत परत आल्याबद्दल हार्दिकचे कौतुक केले. उल्लेखनीय म्हणजे, टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतासाठी हार्दिकचा हा पहिलाच सामना होता कारण अष्टपैलू खेळाडूने पाठीच्या दुखापतीच्या दीर्घकाळापासून बरे होण्यासाठी ब्रेक घेतला होता. हार्दिकने गुजरात टायटन्ससाठी 4 व्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि तो सहजतेने फिनिशरच्या भूमिकेत दिसला.