
IND vs ENG Series 2021: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी सोमवारी कोविड-19 संबंधित निर्बंध हटवण्याची घोषणा केली जी क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर घेऊन आली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून आता प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर परवानगी मिळेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गेल्या महिन्यात साऊथॅम्प्टन येथे मर्यादित प्रेक्षकांसमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल खेळला गेला होता. टीम इंडिया (Team India) खेळाडू सध्या 20 दिवसाच्या ब्रेकवर असून 14 जुलै रोजी पुन्हा बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. यानंतर, नॉटिंघॅम (Nottingham) येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारत 'सिलेक्ट काउंटी इलेव्हन'विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. (IND vs ENG Test Series 2021: टीम इंडियाला मोठा दिलासा, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ECB ने मान्य केली BCCI ची ही मागणी)
ईसीबी (ECB) प्रवक्त्याने सांगितले की, “भारतीय संघाच्या पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारीसाठी 'सिलेक्ट काउंटी इलेव्हन'विरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळण्याची विनंती बीसीसीआयने आमच्या निदर्शनास आणली आहे.” तीन दिवस चालणाऱ्या या सामन्याल प्रथम श्रेणीचा दर्जा देण्यात येणार असून यापूर्वी ‘कॉम्बाइन्ड काउंटी’ म्हणून ओळखल्या जाणार्या संघात काउंटी सर्किटमधील खेळाडूंचा समावेश आहे. हा सामना 20 ते 22 जुलै दरम्यान खेळला जाण्याची शक्यता आहे. सुनील गावस्कर यांच्यासह अनेक माजी खेळाडू म्हणाले होते की न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी भारताची पूर्व तयारी नव्हती. किवी संघ भारतापेक्षा जवळपास एक महिन्यापूर्वी युनायटेड किंगडममध्ये दाखल झाला होता आणि दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला, तर भारतीय संघ केवळ इंट्रा-स्कॉड सामना खेळू शकला. न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी कोणताही प्रथम श्रेणी सामना न मिळाल्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नाराज होता. त्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड बोर्डाकडे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या कवटी मालिकेपूर्वी काऊंटी संघांविरुद्ध 2 सराव सामन्यांसाठी मागणी केली होती.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रथम सामना नॉटिंघॅम येथे 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल. त्यानंतर, लॉर्ड्स (12-16 ऑगस्ट), लीड्स (25-29 ऑगस्ट), ओव्हल (2-6 सप्टेंबर) आणि मँचेस्टर (10-15 सप्टेंबर) येथे शेवटचा व अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने येतील. इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या दुसऱ्या चक्राला सुरुवात होणार आहे.