IND vs ENG Test Series 2021: टीम इंडियाला मोठा दिलासा, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ECB ने मान्य केली BCCI ची ही मागणी
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test Series 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) टीम इंडिया (Team India) 4 ऑगस्टपासून यजमान ब्रिटिश संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर 20 दिवसांच्या ब्रेकवर आहेत आणि 14 जुलै रोजी बायो-बबलमध्ये परततील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विनंतीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (Engalnd and Wales Cricket Board) कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी सराव सामन्याचे आयोजन करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी कोणताही प्रथम श्रेणी सामना न मिळाल्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाराज होता. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) ईसीबीला (ECB) काऊंटी संघांविरुद्ध 2 सराव सामन्यांसाठी प्रतिबद्ध केले आहे. दोन्ही सराव सामने डरहॅम येथेच खेळले जातील. (IND vs ENG Series 2021: भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ब्रिटिश कर्णधार Joe Root ने या मोठ्या बदलाची केली मागणी)

आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध दणदणीत पराभव पत्करावा लागला. जागतिक कसोटी जिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात किवी संघाने 8 विकेटच्या मोठ्या विजयासह विजेतेपद पटकावले. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघ कोणताही सराव सामना न खेळता अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरला होता, ज्याचा परिणाम स्पष्ट दिसुन आला. पहिला सराव सामना चार दिवसांचा असेल जो जुलैच्या शेवटच्या आठवड्यात खेळला जाईल. भारतीय संघ कोणत्या काऊंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळेल, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. यानंतर भारतीय संघ टीम काऊंटी निवड-11 विरुद्ध तीन दिवसीय सामना देखील खेळेल.

टीम इंडिया यजमान ब्रिटिश संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान नॉटिंघॅममध्ये खेळणार आहे तर यानंतर संघ 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान लॉर्ड्स येथे दुसरा सामना खेळेल. तिसर्‍या सामन्यात दोन्ही संघ 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान लीड्समध्ये आमनेसामने येतील. चौथा कसोटी सामना लंडनमध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल आणि पाचवा व अंतिम सामना 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान दोन्ही संघ मँचेस्टर येथे होईल. दरम्यान, साऊथॅम्प्टनच्या एजस बाऊल येथे झालेल्या अंतिम लढतीनंतर झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर शुभमन गिलला आठ आठवड्यांपर्यंत बाहेर बसावे लागणार आहे. तसेच, वेगवान गोलंदाज इशांत शर्माला देखील डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात चेंडू रोखताना त्याच्या गोलंदाजीच्या हाताला दुखापत झाली होती आणि त्याला तीन टाके घालावे लागले. परंतु इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यापर्यंत वेगवान गोलंदाज वेळेवर तंदुरुस्त होईल.