दीपक चाहर, विराट कोहली आणि टी नटराजन (Photo Credit: PTI)

India Playing XI for 5th T20I vs England: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना 20 मार्च (शनिवारी) रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. पाच सामन्यांची मालिका सध्या 2-2 अशा बरोबरीत आहे आणि हा सामना जिंकणारा संघ ही मालिका खिशात घालेल. चौथ्या टी -20 सामन्यात टीम इंडियाने (Team India) चमकदार कामगिरी करत इंग्लिश संघाला रोमांचक सामन्यात 8 धावांनी पराभूत केले. शनिवारी होणाऱ्या मालिकेच्या निर्णयक सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीला भारतीय लाइन-अपमध्ये 1 बदल करू शकतो जे सर्वांना सध्या अपेक्षित आहे. आणि ते म्हणजे सलग चौथ्यांदा अपयशी ठरल्यानंतर अखेर केएल राहुलला बाहेर करत त्याच्या जागी सलामीला ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर पराभवानंतर इयन मॉर्गन संघाच्या गोलंदाजी हल्ल्यात बदल करू शकतो. (Virat Kohli Injury Update: फिल्डिंग दरम्यान विराट कोहली दुखापतग्रस्त, 5व्या टी-20 सामन्यातून होणार का कॅप्टनची सुट्टी? वाचा सविस्तर)

चौथ्या टी -20 सामन्यात टीम इंडियाने मालिकेत जोरदार पुनरागमन केले असून अखेरच्या सामन्यात देखील ते लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. फलंदाजीमध्ये सलग चौथ्या डावात फ्लॉप ठरल्यानंतर राहुलला बाहेर करत त्याच्या जागी शिखर धवन किंवा ईशान किशनचा समावेश केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, दोन्ही फलंदाजांनी मालिकेत प्रत्येकी एक सामनाच खेळला आहे. सूर्यकुमारने बॅटिंग पदार्पणातील सामन्यात अर्धशतक झळकावत अंतिम सामन्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे. म्हणजेच रोहित-ईशानची जोडी टीमकडून सलामीला येईल आणि सूर्या तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. कर्णधार कोहलीसुद्धा या मालिकेत चांगल्या लयीत दिसला आहे तर, श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतल्यास संघासाठी फायदेशीर ठरेल. शिवाय, मागील सामन्यात महागडा ठरलेल्या वॉशिंग्टन सुंदरचे स्थान देखील कायम राहील. सुंदरने मागील सामन्याच्या 4 ओव्हरमध्ये 52 धावा दिल्या होत्या. शिवाय, फिटनेस टेस्ट पास केलेल्या टी नटराजनला संधी मिळते की नाही याकडे देखील सर्वांच्या नजरा लागून असतील.

चौथ्या टी-20 सामन्यासाठी असा असेल भारतीय प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन/शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि राहुल चाहर.