
IND vs ENG 4th Test Day 3: अहमदाबाद (Ahmedabad) येथे चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाची घोषणा झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचा (India) पहिला डाव 114.4 षटकात 364 धावांवर संपुष्टात आला आणि यजमान संघाने 160 धावांची आघाडी घेतली. भारताचा डाव संपुष्टात आल्याने वॉशिंग्टन सुंदरचे (Washington Sundar) शतक थोडक्यात हुकले आहे. पहिल्या सत्राची घोषणा झाली तेव्हा जॅक क्रॉली आणि डॉम सिब्लीच्या जोडीने इंग्लंडकडून (England) दुसऱ्या डावात फलंदाजीची सुरुवात केली असून क्रॉली 5 धावा आणि सिब्ली 1 धाव करून खेळत होते. भारताकडून पहिल्या डावात रिषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक 101 धावांची शतकी खेळी केली तर सुंदरने नाबाद 96 धावा केल्या. तसेच रोहित शर्माने 49 आणि अक्षर पटेलने 43 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने (Ben Stokes) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने 2 आणि जॅक लीचने 2 विकेट्स घेतल्या. (IND vs ENG 4th Test Day 3: पंत-सुंदर-अक्षरने इंग्लंडला धू धू धुतलं! अहमदाबाद टेस्टमध्ये टीम इंडियाकडे 160 धावांची निर्णायक आघाडी)
तिसऱ्या दिवशी भारताने 7 बाद 294 या धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सुंदर आणि पटेलने धावसंख्येचा वेग कायम ठेवला आणि भारताला 350 धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र, 114व्या ओव्हरमध्ये जॉनी बेअरस्टोने पटेलला 43 धावांवर धावबाद करत दोघांमध्ये 106 धावांची भागीदारी मोडली. त्यानंतर, पुढच्याच चेंडूवर स्टोक्सने इशांत शर्माला पायचीत केले. अखेर 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मोहम्मद सिराज देखील फार काही करु शकला नाही आणि त्याला देखील स्टोक्सनेच त्रिफळाचीत करत भारताला पहिल्या डावात 365 धावांवर गुंडाळलं. मात्र यामुळे सुंदरचे शतक थोडक्यात हुकले आणि तो 174 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह 96 धावांवर नाबाद राहिला.
यापूर्वी, पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. संघासाठी बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या तर डॅन लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 तसेच मोहम्मद सिराजला 2 विकेट मिळाल्या.