IND vs ENG 4th Test Day 3: पंत-सुंदर-अक्षरने इंग्लंडला धू धू धुतलं! अहमदाबाद टेस्टमध्ये टीम इंडियाकडे 160 धावांची निर्णायक आघाडी
वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 4th Test Day 3: अहमदाबाद (Ahmedabad) येथे इंग्लंड (England) संघाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाशी भारतीय संघाचा (Indian Team) पहिला डाव 365 धावांवर आटोपला. अहमदाबाद टेस्टच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) अर्धशतकी भागीदारीने इंग्लंड गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. दोघांनी इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करत शतकी भागीदारी करत पहिल्या डावात संघाला 160 धावांची निर्णायक आघाडी मिळवून दिली. सुंदर नाबाद 96 धावा आणि पटेल 43 धावा करून बाद झाले. यापूर्वी, दुसऱ्या दिवशी संघासाठी रिषभ पंतने (Rishabh Pant) दबावात 101 धावांची निर्णायक शतकी खेळी केली तर सलामी फलंदाज रोहित शर्माने 49 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, इंग्लिश गोलंदाज दिवसाच्या पहिल्या सत्रात विकेटसाठी संघर्ष करताना दिसले. इंग्लंडसाठी पहिल्या डावात बेन स्टोक्सने (Ben Stokes) सर्वाधिक 4 तर जेम्स अँडरसनने 3 आणि जॅक लीचला 2 विकेट मिळाल्या. (IND vs ENG 4th Test 2021: Rohit Sharma याने विचारले- 'विकेटच्या मागे का इतकी बडबड करतो?' Rishabh Pant याने दिले मन जिंकणारे उत्तर)

मोटेरा येथे खेळल्या जाणार्‍या या कसोटी सामन्यात भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे. संघाने तिसऱ्या दिवशी 294/7 धावसंख्येपासून पुढे खेळत पहिल्या सत्रात आणखी धावांची भर घातली. सुंदर आणि पटेलच्या जोडीने आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यादरम्यान, पटेल चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. अक्षरने 43 धावांची खेळी केली. अक्षरने 97 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकले. अखेर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला बाद करत स्टोक्सने भारताचा डाव संपुष्टात आणला. यापूर्वी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंत आणि सुंदरने टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी 7व्या विकेटसाठी 158 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली जी सामन्याचा मोठा टर्निंग पाईंट ठरला. यादरम्यान पंतने कारकिर्दीतील आपले तिसरे तर भारतातील पहिले कसोटी शतक ठोकले. संघ अडचणीत असताना पंत आणि सुंदर धावून आले व इंग्लंड गोलंदाजांची धुलाई केली. शिवाय, सुंदरने पटेलच्या साथीने तिसऱ्या दिवशीही इंग्लंडवरील दबाव कायम ठेवला.

सामन्याच्या सुरुवातील इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र टीम इंडियाच्या फिरकीपुढे इंग्लंड फलंदाजांनी पुन्हा एकदा लोटांगण घातलं आणि संपूर्ण संघ पहिल्या डावात 205 धावांवर ऑलआऊट झाला.