IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंडविरुद्ध (England) सुरु असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा भोपळा न फोडता पॅव्हिलियनमध्ये परतला. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कोहली 8 चेंडूत एकही धाव न करता तंबूत परतला. आपल्या कसोटी कारकिर्दीत शून्यावर बाद होण्याची विराटची ही 12वी वेळ ठरली. विशेष म्हणजे या दरम्यान प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळे गोलंदाज नडले आहेत. तर कर्णधार म्हणून कोहली आठव्यांदा शून्यावर बाद झाला असून इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) या दरम्यान त्याला पाच वेळा पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लिश संघाचे गोलंदाज अव्वल स्थानावर आहेत. यामध्ये इंग्लंडची दिग्गज वेगवान जोडी जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांचाही समावेश आहे. (IND vs ENG 4th Test 2021: रोहित शर्माची एकहजारी, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला ओपनर)
विराटला कसोटी क्रिकेटमध्ये आजवर सर्वाधिक वेळा बाद करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनच्या नावावर आहे. लायनने विराटला 7 वेळा बाद केले असून इंग्लंडच्या मोईन अलीने 5 वेळा भारतीय कर्णधाराला माघारी धाडलं आहे. यानंतर, अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, स्टोक्सने विराटला 5 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये मैदानाबाहेर पाठवले आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला न्यूझीलंडच्या टिम साउथीने सर्वाधिक 10 (3 टेस्ट, 6 वनडे आणि 1 टी-20) वेळा आऊट करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, टेस्ट क्रिकेटमध्ये विराटला आजवर एका फिरकीपटूसह 11 गोलंदाजांनी भोपळा फोडू दिला नाही. यामध्ये, बेन हिलफेनहॉस, बेन स्टोक्स, लिअम प्लंकेट, स्टुअर्ट ब्रॉड, केमार रोच, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, रवी रामपॉल, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल व बांग्लादेशचा युवा वेगवान गोलंदाज अबु जायेद आहेत तर मोईन अली एकमेव फिरकीपटू आहे ज्याने विराटला शून्यावर बाद केले आहे.
अहमदाबाद येथे सुरु असलेल्या सामन्याबद्दल बोलायचे तर इंग्लिश टीमने केलेल्या 205 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 5 विकेट गमावून 130 धावा केल्या असून ते अद्याप इंग्लंडच्या 75 धावांनी पिछाडीवर आहेत. रिषभ पंत 22 धावा आणि अश्विन 7 धावा करून खेळत आहेत.