IND vs ENG 4th Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) सलामी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या नावावर खास विक्रम नोंदविला आहे. रोहित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) 1000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला ओपनर ठरला. एकूणच हा पराक्रम करणारा तो सहावा फलंदाज तर फक्त दुसरा भारतीय फलंदाज आहे. रोहितपूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपमधील (ICC WTC) सर्वाधिक धावा सध्या मार्नस लाबूशेनच्या नावावर असून त्याने 13 सामन्यांत 1675 धावा केल्या आहेत. रहाणेनेही 1050 हून अधिक धावा केल्या असून सध्या या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. (IND vs ENG 4th Test: विराट कोहलीच्या कमजोरीचा Ben Stokes याने घेतला फायदा; ‘शून्यावर’ बाद होताच किंग कोहलीने केली MS Dhoni याच्या नकोशा रेकॉर्डची बरोबरी)
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाला सुरुवातीलाच लागोपाठ 3 धक्के बसले. यानंतर रोहित-रहाणेने संघाचा डगमगता डाव सांभाळला. फलंदाजीस प्रतिकूल असलेल्या अहमबादच्या खेळपट्टीवर सावधपणे फलंदाजी करत रोहित 30 पेक्षा अधिक धावा करून खेळत असून आपल्या छोटेखानी खेळीने सलामी फलंदाज म्हणूनही एकहजारी धावसंख्या गाठली. रोहित 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्यांदा ओपनर म्हणून मैदानात उतरला होता. त्यांनतर, त्याने स्वतःला सिद्ध करत अवघ्या 17 डावात हजारी धावसंख्येचा टप्पा गाठला असून त्याने दक्षिण आफ्रिकाचे माजी सलामीवीर ग्रीम स्मिथची बरोबरी केली आहे. सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा मुंबईकर वेगवान आशियाई फलंदाजही बनला. यापूर्वी, मयंक अग्रवालने 19 डावात 1000 धावसंख्या पार केली होती. जागतिक क्रिकेटमध्ये हर्बर्ट सुटक्लिफच्या 13 आणि लेन हटननेच्या 16 डावानंतर तिसर्या क्रमांकावर आहे.
अलीकडेच रोहितने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या रोहितने सहा स्थानांची झेप घेत रँकिंगमध्ये करिअरमधील सर्वोत्तम आठवे स्थान पटकावले आहे. चौथ्या कसोटीपूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांमध्ये 59.20 च्या सरासरीने 296 धावा फटकावल्या आहेत.