IND vs ENG 2nd Test Day 3: दुसऱ्या चेन्नई टेस्टच्या (Chennai Test) तिसऱ्या दिवसाच्या पाहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला असून यजमान संघाने 6 विकेट गमावून 156 धावा केल्या आहेत. चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 38 धावा आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) 34 धावा करून खेळत होते. दुसऱ्या डावात भारतीय संघाला 195 धावांची आघाडी मिळाली होती आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्यांनी आणखी भर घालत आघाडी 351 धावांपर्यंत वाढवली. 1 बाद 54 धावांपासून पहिल्या स्ट्रेटची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाने (Team India) सत्राखेर 5 अधिक विकेट गमावल्या. जॅक लीचने (Jack Leech) सर्वाधिक 3 तर मोईन अलीला 2 विकेट मिळाल्या. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातील दीडशतकवीर रोहित शर्मा खास खेळ करू शकला नाही आणि 26 धावांवर बॅड झाला. चेतेश्वर पुजाराने 7 धावा, रिषभ पंतने 8 धावा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 10 धावा करून माघारी परतले. (IND vs ENG 2nd Test 2021: Michael Vaughan यांची चेपॉक खेळपट्टीवर टीका, शेन वॉर्नच्या प्रतिक्रियेने झाली बोलती बंद, पहा Tweet)
तिसऱ्या दिवशी रोहित आणि पुजाराने टीम इंडियाकडून 54/1 धावसंख्येपासून बॅटिंगला सुरुवात केली. यजमान संघाची दिवसाची वाईट सुरुवात झाली आणि भारताने दुसऱ्या डावात एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या. पुजारा 7 धावांवर रनआऊट झाला. यानंतर, रोहितकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो अपेक्षापूर्ती करण्यात अपयशी ठरला आणि 26 धावांवर स्टंपिग आऊट झाला. विकेटकीपर बेन फोक्सने लीचच्या बोलिंगवर रोहितला स्टंपिंग आऊट केलं. उपकर्णधार रहाणे 10 धावा करुन स्वस्तात तंबूत परतला. टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरले असून पुजारा, रोहितनंतर रिषभ पंतही स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आणि भारताची 65 धावांवर 4 विकेट अशी स्थिती झाली. अक्षर पटेल देखील कर्णधार कोहलीला जास्तकाळ साथ देऊ शकला नाही. मात्र, दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपण्यापूर्वी कोहली आणि रविचंद्रन अश्विनने भागीदारी अर्धशतकी करत इंग्लंड गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कॅप्टन कोहलीने चौकार खेचत आघाडी 300 पार नेली.
यापूर्वी, भारताच्या पहिल्या डावातील 329 धावांच्या प्रत्युतरात इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर आटोपल. यामुळे भारताला 195 धावांची मोठी आघाडी मिळाली. अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंड फलंदाजांनी गुडघे टेकले. अश्विनने पहिल्या डावात इंग्लंडच्या 5 फलंदाजांना बाद केलं.