IND vs AUS 2nd Test 2020: पदार्पणवीर शुभमन गिलची कमाल, ऑस्ट्रेलियामध्ये डेब्यू टेस्ट डावात सर्वोच्च धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील
शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test 2020: भारतीय सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) रविवारी ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे. कांगारू संघाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचमध्ये डेब्यू करणाऱ्या शुभमनने दुसर्‍या दिवशी 48 धावा केल्या. त्याने कारकिर्दीतील पहिल्या कसोटी डावात 65 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार ठोकले. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन टीमने या दरम्यान त्याचे 2 झेल सोडले ज्याचा फायदा युवा भारतीय फलंदाजाने घेतला आणि ऑस्ट्रेलियात पदार्पणाच्या कसोटी डावात सर्वोच्च धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले. शुभमनने यादीत माजी फलंदाज हृषीकेश कानिटकर यांची बरोबरी केली ज्यान्नी देखील 1999 मध्ये पदार्पणाच्या कसोटी डावात 45 धावांची खेळी केली होती. अ‍ॅडिलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉच्या खराब कामगिरीनंतर गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्‍या कसोटीत संधी देण्यात आली. (IND vs AUS 2nd Test 2020: MCG मध्ये दुसऱ्या दिवशी पॅट कमिन्सचा डबल दणका, लंचपर्यंत भारताने 90 धावांवर गमावल्या 3 विकेट)

गिलने 65 बॉलच्या खेळीत 8 चौकार ठोकले आणि सहकारी सलामी फलंदाज मयंक अग्रवाल लवकर बाद झाल्यावरही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध जोरदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मयंकच्या नावावर आहे. अग्रवालने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात 76 धावा केल्या होत्या. सिडनी येथेडिसेंबर 1947 मध्ये पदार्पणाच्या सामन्यात 51 धावा करणारे दत्तू फडकर दुसर्‍या क्रमांकावर आहेत. शिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच डावात 40 हुन अधिक धावा करणाऱ्यांमध्ये 21 वर्षीय गिल सर्वात कमी वयाचा फलंदाज आहे. भारताकडून, बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात शुभमनसह मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, यापूर्वी त्याआधी मयंकने 2018, केएल राहुलने 2014 आणि कानिटकर यांनी 1999 बॉक्सिंग डे कसोटीतून मेलबर्न येथे पदार्पण केले होते.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 195 धावांवर ऑलआऊट करत भारताने दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने 3 विकेट गमावून 90 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाच्या 105 धावांनी मागे आहेत. शुभमन वगळता चेतेश्वर पुजाराने 17 धावा केल्या. लंचसाठी खेळ थांबला ठेवा भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 10 धावा आणि हनुमा विहारी नाबाद 13 धावा करून खेळत होते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवत विरोध संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. कमिन्सला 2 तर मिचेल स्टार्कला 1 विकेट मिळाली.