पॅट कमिन्स आणि कर्णधार टिम पेन (Photo Credit: Twitter/cricketcomau)

IND vs AUS 2nd Test 2020: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourn Cricket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचमध्ये दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने 3 विकेट गमावून 90 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाच्या 105 धावांनी मागे आहेत. दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापूर्वी पॅट कमिन्सने (Pat Cummins) भारताला डबल दणका दिला. कमिन्सने शुभमन गिल (Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) अशा धोकादायक आघाडी फलंदाजांना माघारी धाडलं. पदार्पणवीर शुभमनने 45 धावा तर पुजारा 17 धावा करून बाद झाला. लंचसाठी खेळ थांबला ठेवा भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 10 धावा आणि हनुमा विहारी नाबाद 13 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवत विरोध संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. कमिन्सला 2 तर मिचेल स्टार्कला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd Test 2020: 'मी अजिंक्यचं कौतुक करणार नाही,' ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेच्या आश्वासक नेतृत्वानंतर सुनील गावस्कर यांचे मोठे विधान)

दुसऱ्या दिवशी शुभमन आणि पुजाराने संथ सुरुवात केली. पहिल्या दिवशी सलामी फलंदाज मयंक अग्रवाल शून्यावर बाद झाल्यावर शुभमन आणि पुजाराच्या अर्धशतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. दोंघानी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शुभमन अर्धशतकी आकडा गाठेल असे वाटत असताना कमिन्सने त्याला विकेटकीपर टिम पेनकडे कॅच आऊट करत माघारी धाडलं. शुभमनने आपल्या खेळीत 65 चेंडू खेळत 8 चौकार लगावले. कमिन्सने आपल्या पुढील ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर पुजाराला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. पुजारा 70 चेंडूत 17 धावाच करू शकला. पहिल्या दिवशी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी केली, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही. कांगारू संघाचा पहिला डाव 195 धावांवर संपुष्टात आला तर टीम इंडियाने दिवसाअखेर 1 बाद 36 पर्यंत मजल मारली. भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट तर रविचंद्रन अश्विनने 3 गडी बाद केले. पदार्पणवीर मोहम्मद सिराजने मार्नस लाबूशेन आणि कॅमरुन ग्रीनला माघारी धाडलं.

मेलबर्न येथील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यातील आपल्या विजयी संयोजनात एकही बदल केला नाही. भारताकडून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना पदार्पणाची संधी मिळाली आणि दोघांनी पहिल्या डावात बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी बजावली.