बाबर आझम आणि जसप्रीत बुमराह (Photo Credit: Facebook)

आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) पाकिस्तानचा व्हाईट बॉल कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टॉप-5 मध्ये पोहचला आहे. बाबर आज आधुनिक युगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. इंग्लंड (England) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) साऊथॅम्प्टन येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याआधी 6 व्या स्थानावर असलेल्या आझमने ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरला पछाडत अव्वल 5 मध्ये प्रवेश मिळवला. दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात आझमने 127 चेंडूत 47 धावा ठोकल्या. सध्या 26 वर्षीय बाबर अव्वल टी-20 क्रमांकाचा फलंदाज आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो तितकाच हुशार आहे, जिथे त्याची सरासरी गेल्या दोन वर्षात 50 पेक्षा जास्त आहे. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तो विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या भारतीय जोडीच्या अगदी मागे आहे. कसोटी सामन्यांच्या क्रमवारीत उर्वरित चार क्रमवारीत अद्याप बदल झालेले नाही. (ENG vs PAK 2nd Test: इंग्लंड-पाकिस्तान साऊथॅम्प्टन टेस्ट अनिर्णित, इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचे पहिले स्थान कायम राखले आहे. दुसर्‍या क्रमांकावर विराट कोहली, मार्नस लाबूशेन आणि केन विल्यमसन यांचे स्थान कायम आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि कर्णधार जो रूट यांनी अनुक्रमे सातवे व नववे स्थान कायम राखले आहे. आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत (ICC Test All-rounder Ranking) क्रिस वोक्स सातव्या स्थानावर पोचला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये पाकिस्तानचा फलंदाज शान मसूदने 156 धावांच्या शानदार खेळीमुळे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 19 व्या स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानसाठी, मसूद कसोटी मालिकेत दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज आहे. इंग्लंडचे माजी अव्वल गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे. गोलंदाजांच्या यादीत ब्रॉड दुसर्‍या स्थानावर आला आहे तर अँडरसन दोन स्लॉटसह 14 व्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास आठव्या स्थानी पोहोचला. गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहची 9 व्या स्थानी घसरण झाली आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत इंग्लंड 279 गुणांसह तिसर्‍या तर पाकिस्तान 153 सह पाचव्या स्थानावर आहे.गुणतालिकेत भारत 360 पॉईंट्ससह पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये प्रत्येक मालिकेचे मूल्य 120 गुण आहे.