ENG vs PAK 2nd Test: इंग्लंड-पाकिस्तान साऊथॅम्प्टन टेस्ट अनिर्णित, इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी
इंग्लंड-पाकिस्तान साऊथॅम्प्टन टेस्ट (Photo Credit: Twitter/ICC)

इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात साऊथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाऊल येथे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या चार दिवस पाऊस पडला, तर पाचव्या दिवशी मैदान ओले झाल्यामुळे दोन सत्रानंतर खेळ सुरू झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 236 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने सामना अनिर्णित होण्यापूर्वी चार गडी गमावून 110 धावा केल्या. जॅक क्रॉलीने अर्धशतक झळकावले, तर पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बासने (Mohammad Abbas) दोन विकेट्स घेतल्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने पाठलाग सोडला नाही आणि पहिल्या दोन सत्र धुवून काढली. तिसर्‍या आणि शेवटच्या सत्रात ढगांनी काहीसा दिलासा दिला आणि त्यानंतर सुमारे 38 ओव्हरचा खेळ झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी,रविवारी पाकिस्तानचा पहिला डाव संपला. यापूर्वी सोमवारी पहिल्या दोन सत्राचा खेळ पावसामुळे वाया गेल्यावर तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला होता. (ENG Tour of PAK 2022: वसिम अक्रम यांनी इंग्लंडकडून उपकाराची परतफेड करण्याची केली मागणी, 2022 मध्ये पाकिस्तान दौरा करण्याची मागणी करत सुरक्षेचे दिले आश्वासन)

इंग्लंडने 7/1 धावसंख्येपासून खेळण्यास सुरवात केली. इंग्लंडकडून क्रॉलीने 53 धावा केल्या. शिवाय डोमिनिक सिबालेनेही 32 धावांचे योगदान दिले. मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना 21 ऑगस्टपासून याच मैदानावर खेळला जाईल. या कसोटीत पावसाने दररोज वर्चस्व राखले असून 4 दिवसांपर्यंत केवळ 96 ओव्हरचा खेळ होऊ शकला. जो रूटने नाबाद 9 आणि जोस बटलर एकही रन न करता नाबाद परतला. इंग्लंडने 38.1 ओव्हरमध्ये 110-4च्या धावसंख्येवर डाव घोषित केला आणि सामना अनिर्णित सुटला. अब्बासने 14 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. पावसामुळे सामना अनिर्णित राहिल्याने पाकिस्तानकडे आता मालिका वाचवण्यासाठी फक्त एक संधी आहे. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या सामन्यात पराभव झाल्यास पाकला मालिका पराभवाला सामोरे जावे लागेल.

मॅन्चेस्टर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने 3 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. पाकिस्ताननी गोलंदाजांनी सामन्यात प्रभावी कामगिरी बजावली पण दुसऱ्या डावात फलंदाजांनी निराश केले. दुसऱ्या सामन्यात देखील फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून साउथॅम्प्टन सामन्यात मोहम्मद रिझवानने 72 आणि अबिद अलीने 60 धावा धावा केल्या. या शिवाय, बाबर आझमने 47 आणि कर्णधार अझर अलीने 20 धावांचे योगदान दिले.