क्रिकेट स्टेडीयम, संग्रहित प्रतिमा (Photo: cricketmaharashtra.com)

क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील गहुंजे मैदानाचा ताबा बँक ऑफ महाराष्ट्रने प्रतिकात्मकरित्या स्वत:कडे घेतला आहे. गहुंजे मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत येते. या मैदानाच्या उभारणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून 69.50 कोटींचं कर्ज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने घेतले होते. दरम्यान, या कर्ज फेडताना सातत्य राहिले नाही. तसेच, कर्जाचे हाप्ते थकले. त्यामुळे बँकेने कारवाई करत हा ताबा स्वत:कडे घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बँकेने ही कारवाई केली असली तरी, महाराष्ट्र क्रिकेटवर मात्र त्याचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 69.50 कोटी रुपयांच कर्ज घेतलं होतं. हे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा आणि आंध्र बँक या आघाडीच्या प्रमुख ४ बँकांनी मंजूर केलं होतं. दरम्यान, असोशिएशनला हे कर्ज जरी या ४ बँकांनी दिलं असलं तरी, या चारही बँकांचं नेतृत्व बँक ऑफ महाराष्ट्रकडे आहे. त्यामुळे कर्जाचे हाप्ते थकल्याने केलेल्या कारवाईत बँक ऑफ महाराष्ट्रने या मैदानाचा ताबा प्रतिकात्मक रुपात स्वत:कडे घेतला आहे. दिलेल्या मुदतीत हाप्ते भरण्यात आले नाहीत. त्यामुळे बँकेला मैदानाचा ताबा घेण्याशिवाय पर्यायच नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

दरम्यान, कर्जांचे हाप्ते आणि मैदानाचा ताबा याबाबात बँकेकडून नोटीस आल्याच्या वृत्ताला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनीही दुजोरा दिला आहे. (हेही वाचा, इकाना नव्हे आता अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम !आज रंगणार पहिला आंतरराष्ट्रीय सामना)

कर्जाचे हप्ते थकले कारण?

  • महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा इंडिया समूह यांच्यात एक करार झाला होता.
  • उभय संस्थांमधील करार हा जाहीरातींबाबत होता. सहारा समुहाकडून सुमारे 215 कोटींच्या जाहीरात असोसिएशनला मिळणार होत्या.
  • दरम्यान, सहारा समूह करारातून बाहेर पडला. त्यामुळे असोशिएशनसमोर आर्थिक संकट उभे राहिले.
  • आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीला पत्र लिहीले.
  • या पत्रात संघटनेच्या हिस्स्यातला निधी शक्य तितक्या लवकर मिळावी अशी विनंती करण्यात आली.

दरम्यान, प्राप्त माहिती अशी की, 4.5 कोटी रुपये असोशिएशनने बँकेकडे जमा केले आहेत. मात्र, अद्यापही कारवाई टाळण्यासाठी असोशिएशनला तब्बल १७.१६ कोटी रुपायांची आवश्यकता आहे. तसेच, हे पैसे बँकेकडे तत्काळ जमा करायचे आहेत. त्यामुळे असोशिएशन या पेचातून कसा मार्ग काढते हे पाहणे उत्सुकतेचे आहे.