Brahma Kamal Flowers Bloom in Uttarkhand’s Rudraprayag District (Photo Credits: Video Screengrab/ ANI/ Twitter)

ब्रम्ह कमळ (Brahma Kamal) हे फूल हे वर्षातून केवळ एकदाच उगवतं त्यामुळे या फुलाबाबत अनेकांच्या मनात आकर्षण असतं. सुमारे 8 इंचाच्या या फुलाला पूर्णपणे उमलण्यासाठी अंदाजे 2 तासांचा वेळ लागतो. साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत हे फूल उमलतं पण यंदा उत्तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यातही ब्रम्ह कमळं उमलली आहेत. हिमालय, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात ब्रम्ह कमळ अधिक प्रमाणात आढळतात. सध्या उत्तरखंडात (Uttarakhand) रूद्रप्रयागमध्ये (Rudraprayag) काही भाग हा ऐन ऑक्टोबर महिन्यातही बहरला आहे. क्लायमेट चेंजमुळे हा नजारा यंदा ऑफ सीझन पहायला मिळाला आहे. तर सोशल मीडियामध्येही त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकर्‍यांनीही या नजार्‍याचा ऑनलाईन आनंद घेतला आहे.

भारताच्या अनेक भागात अजूनही ऑक्टोबर हीट आणि अवकाळी पावसाचं वातावरण असताना उत्तर भारतामध्ये मात्र थंडी चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेकडून सध्या रूद्रप्रयाग भागात बहरलेल्या ब्रम्ह कमळाचा नजारा एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करण्यात आला आहे. या भागात अनेक पर्यटक गोष्टी आहेत. धार्मिक स्थळांपासून अदभूत नैसर्गिक नजार्‍याची येथे जादू अनुभवता येते.

रूद्रप्रयाग भागातील बहरलेली ब्रम्ह कमळं

हिंदू संस्कृतीमध्ये ब्रम्ह कमळाचं धार्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे हे अनेक घराघरामध्येही लावलं जातं. तुम्ही देखील तुमच्या घरात हे ब्रम्ह कमळ सहज लावू शकता.

घरी ब्रम्ह कमळ लावण्यासाठी काय कराल?

ब्रम्ह कमळ घरी लावण्यासाठी तुम्हांला त्याच्या पानाचा कापलेला तुकडा मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ब्रम्ह कमळाचं झाड असेल किंवा नर्सरीमधून तुम्ही ते मिळवू शकता. कापलेला पानाचा भाग मातीच्या कुंडीमध्ये ठेवा. ही कुंडी थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका तसेच फार पाणी घालणं देखील टाळा. निवडुंगाच्या प्रजातीमधील हे झाड असल्याने त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. किमान 2-3 दिवसांतून एकदा पाणी घालणंदेखील या झाडासाठी पुरेसे आहे. शक्यतो हिवाळ्यामध्ये हे झाड लावा आणि त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर तुम्हांला पावसाळ्यात ब्रम्ह कमळ उगवलेलं पहायला मिळू शकतं.