आईचे प्रेम की तिच्यावर अत्याचार? ऑक्सिजन सपोर्टवर असताना माऊली स्वयंपाक घरात बनवतेय पोळ्या; Viral Photo वरून सोशल मिडियावर नवा वाद (See Post)
ऑक्सिजन सपोर्टवर असताना आईने बनवल्या पोळ्या (संग्रहित संपादित प्रतिमा)

संपूर्ण जगात एकच व्यक्ती अशी असेल जी आपल्या मुलांवर नि:स्वार्थपणाने प्रेम करते, ती म्हणजे आई (Mother). एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. दु:ख, वेदना, आजारपण असतानाही ती आपल्या मुलांचे पोट भरणे विसरणार नाही. मात्र कधीकधी तिच्या याच प्रेमामुळे तिला त्रासही सहन करावा लागतो. सध्या सोशल मिडियावर एक असेच चित्र दिसत आहे, जिथे ऑक्सिजन सपोर्टवर (Oxygen Support) असताना एक आई स्वयंपाकघरात पोळ्या बनवताना दिसत आहे. सोशल मिडियावर हा फोटो व्हायरल होत असून, त्याबाबत नेटीझन्सनी आपला राग वयक्त केला आहे.

या फोटोच्या सत्यतेबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. व्हायरल फोटोत दिसत आहे की, एक महिला ऑक्सिजन सपोर्टवर असूनही स्वयंपाकघरात पोळ्या लाटत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आईचे निस्वार्थ प्रेम’. मात्र हा फोटो पाहून अनेक वापरकर्ते भडकले आहेत. (हेही वाचा: कोविड19 रुग्णांसाठी आईने बनवलेल्या जेवणाच्या डब्यावर चिमुकल्याने लिहिला प्रेमळ संदेश; Viral Photo वर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव)

प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपादने या फोटोवर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ‘जगात अशी किती घरे असतील जिथे आई आजारी पडल्यावर सुट्टी घेत नाही? माहित नाही ही महिला ऑक्सिजनवर असताना खरच पोळ्या बनवत आहे की नाही, पण स्त्रियांना विश्रांती न घेण्यास भाग पाडणारी निःस्वार्थ प्रेमाची ही मालिका संपुष्टात येऊ शकते काय?’

दुसरीकडे तमिळ चित्रपट निर्माते मोहम्मद अली म्हणाले, ‘हे प्रेम नाही. ती सामाजिक रचनेच्या नावाखाली गुलामगिरी आहे.’

काही वापरकर्त्यांनी या फोटोच्या सत्यतेवर शंका घेतली असून हा फोटो फेक असल्याचे म्हटले आहे. अनेक लोकांनी या कृत्याला आईचे प्रेम म्हटले आहे, पण बहुतेकांनी हा महिलेचा परीवाला दोष दिला आहे. तसेच अनेकांनी अशा समाजाची निंदा केली आहे जिथे, प्रेमाच्या नावाखाली महिलांवर असा अत्याचार केला जातो.