कोविड19 रुग्णांसाठी आईने बनवलेल्या जेवणाच्या डब्यावर चिमुकल्याने लिहिला प्रेमळ संदेश; Viral Photo वर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
कोरोना रुग्णांसाठी लहान मुलाचा क्युट मेसेज (Photo Credits: Twitter)

कोविड-19 रुग्णांनी (Covid-19 Patients) शारीरिक आरोग्यसोबतच मानसिक स्वास्थ्य देखील जपणे गरजेचे आहे. कारण या महामारीचा परिणाम केवळ शरीरावर नाही तर मनावरही होताना दिसत आहे. भीती, चिंता, दु:ख यामुळे एक प्रकारची नकारात्मकता सर्वत्र पसरली आहे. या कठीण काळात आपली एखादी छोटीशी कृती देखील पीडितांच्या, कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकते. एका लहानशा मुलाला बहुदा हे कळले असावे आणि त्याने ते आपल्या कृतीत उतरवले आहे. या 6 वर्षांच्या मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.

या मुलाची आई कोरोना रुग्णांसाठी जेवण बनवते. जेवणाच्या डब्यांवर या मुलाने कोरोना रुग्णांसाठी खास संदेश लिहिला आहे. खुश रहा, अशा प्रेमळ संदेशाने कोरोना रुग्णांना नक्कीच प्रचंड आनंद मिळेल. मात्र त मुलाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आद्विक गौतम असे या मुलाचे नाव असून मध्य प्रदेशातील भोपाल जिल्ह्यात राहतो.

पहा फोटो:

व्हायरल फोटोत आद्विक अॅल्युमिनियम फॉईल फुड पॅकेजिंग बॉक्सवर हा संदेश लिहून स्माईली काढताना दिसत आहे. एका ट्विटर युजरने हा फोटो शेअर करत लिहिले, या मुलाची आई कोरोना रुग्णांसाठी जेवण बनवते आणि हा गोड मुलगा जेवणाच्या डब्ब्यांवर त्यांच्यासाठी 'खुश रहा' असा संदेश लिहित आहे. (रुग्णांच्या चेहऱ्यावर हसु येण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गायले 'नमो-नमो' गाणे, पहा Viral Video)

हा फोटो नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस पडला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत या फोटोला 17000 हून अधिक लाईक्स मिळाले असून 3000 हून अधिकवेळा रिट्विट करण्यात आला आहे. तर छान छान कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.