PIB Fact Check: शहरात 15 कि.मी. अंतरावर प्रवास करताना चालकाने हेल्मेट घालण्याची आवश्यकता नाही? जाणून घ्या व्हायरल WhatsApp Message मागील सत्य
Fake news on WhatsApp | (Photo Credits: File Image

भारत सरकारने देशात सर्वत्र हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. अनेक ठिकाणी या नियमाची कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत सोशल मिडियावर अनेक खोटे संदेश व्हायरल होत आहेत. आता हेल्मेटबाबत असाच एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, शहराच्या 15 कि.मी.च्या परिघात वाहन चालकांना आता हेल्मेट घालण्याची गरज भासणार नाही. या संदेशाची खातरजमा न करता अनेकांनी हा मेसेज पुढे पाठवला. आता याबाबत पीआयबीने (PIB) हा संदेश खोटा असल्याचे असल्याचे सांगितले. आहे.

व्हायरल होत असलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, ‘हेल्मेट मुक्त... आतापर्यंत सर्व राज्यांत चालू असलेल्या हेल्मेट तपासणीचे आदेश आता कोर्टाने रद्द केले आहेत. सागरकुमार जैन यांच्या याचिकेनुसार, महापालिकेच्या हद्दीत वाहन चालकाला हेल्मेट घालण्याची सक्ती असणार नाही. ज्या मार्गाला राज्य मार्ग किंवा महामार्गाचा दर्जा प्राप्त असेल फक्त तिथेच ड्रायव्हरने हेल्मेट वापरणे अनिवार्य असणार आहे. जर का तुम्हाला कोणी पोलीस अथवा ट्राफिक हवालदाराने हेल्मेट बाबत टोकले तर तुम्ही त्याला सांगू शकता की, मी महानगरपालिका, पंचायत समिती, शहराच्या हद्दीत आहे. आपणाला हे जाणून आनंद होईल की, आता शहरापासून 15 किमीच्या परिघामध्ये हेल्मेट घालणे आवश्यक नाही. हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतर लोकांनाही कळेल...!!’ (हेही वाचा: मुंबई पोलिसंकडून #binod वापरत सायबर सुरक्षेचा सल्ला, युजर्सनी शेअर केले Funny Memes)

याबाबत पीआयबीने स्पष्टीकरण देत सांगितले आहे की, हा दावा पूर्णतः खोटा आहे. वाहन चालकांना अजूनही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. दरम्यान, मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा 2019 ची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2019 पासून करण्यात आली. रोड सेफ्टीच्या उद्देशाने केंद्राने नवीन मोटार वाहन कायदा आणला. नव्या कायद्यानुसार हेल्मेट न घालता वाहन चालविल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल. नवीन विधेयकानुसार, मद्यपान करून वाहन चालविणे आणि आपत्कालीन वाहनास मार्ग न दिल्यास 10,000 रुपये दंड, तुरूंग किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.