Makeup Brushes (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याच्या स्वच्छतेवर आपण व्यवस्थित लक्ष देत नाही. अशा गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आपल्या डोळ्यांना ज्या गोष्टी अस्वच्छ दिसतात त्या आपण वरचेवर साफ करत असतो, मात्र अशाही अनेक गोष्टी आहेत ज्यांची अस्वच्छता डोळ्यांना दिसत नाही मात्र त्या अक्षरशः टॉयलेट सीटपेक्षाही जास्त अस्वच्छ असतात व त्यांच्या धोक्याची आपल्याला कल्पना नसते. अशीच एक गोष्ट म्हणजे मेकअप ब्रशेस (Makeup Brushes).

तर आजकाल आपण सर्वजणच मेकअप ब्रश वापरतो. मात्र हे ब्रशेस तुम्ही वरचेवर साफ करता? याच उत्तर नाही असेच असेल. आपल्यापैकी बरेच लोक अगदी क्वचितच मेकअप ब्रशेस साफ करतात. कधीकधी हे ब्रश अनेक दिवस आणि आठवडे साफ केले जात नाहीत. आता स्पेक्ट्रम कलेक्शन्सने केलेल्या एका नवीन संशोधनानुसार, नीट न साफ केलेल्या मेकअप ब्रशवर आपल्या घरातील टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया जमा होतात. कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले मुस्लेह यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

अभ्यासात फाउंडेशन ब्रशचे दोन संच वापरले गेले. एक स्वच्छ आणि एक गलिच्छ. संशोधकांनी बेडरुम, मेकअप बॅग, ब्रश बॅग, ब्रश ड्रॉवर आणि बाथरूमसह वेगवेगळ्या ठिकाणी ब्रश ठेवले होते. साधारण 2 आठवडे, म्हणजेच चाचणी कालावधीनंतर दोन्ही ब्रशची तुलना केली गेली. यावेळी खराब ब्रशेसची तुलना टॉयलेट सीटवरून घेतलेल्या स्वॅबशी केली गेली. या अभ्यासात समोर आलेल्या निकालानुसार, टॉयलेट सीटच्या तुलनेत सर्वत्र ठेवलेल्या ब्रशमध्ये जास्त बॅक्टेरिया असलेले आढळून आले आहेत. (हेही वाचा: Maneka Gandhi On Donkey's Milk & Women's Beauty: गाढविनीच्या दुधापासून बनवलेला साबण वाढवतो महिलांचे सौंदर्य- मनेका गांधी)

दुसरीकडे, स्वच्छ ब्रशमध्ये फार कमी बॅक्टेरिया होते. यामध्ये सहभागी झालेल्या प्रतिसादकर्त्यांपैकी 40 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांचे ब्रश 2 आठवड्यात स्वच्छ करतात, तर 20 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांचे ब्रशेस 1-3 महिन्यांनंतर स्वच्छ करतात. कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले यांच्या मते, जर ब्रश वारंवार साफ केला नाही तर, तुम्ही वारंवार आजारे पडण्याच्या शक्यातेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.