लोकमान्य टिळक यांचा फोटो वापरुन गोपाळ कृष्ण गोखले यांना श्रद्धांजली; उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याकडून 'ध' चा 'मा'
Gopal Krishna Gokhale Jayanti | (Photo Credits: twitter)

Gopal Krishna Gokhale Jayanti 2019: उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister of Uttarakhand) हरीश रावत (Harish Rawat) यांनी थोर पुरुषाला श्रद्धांजली वाहताना चक्क 'ध'चा'मा' केला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे व्यक्तीमत्व महात्मा गांधी यांचे गुरु आणि थोर शिक्षणतज्ज्ञ, समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna Gokhale) यांची आज (9 एप्रिल) जयंती आहे. हरीश रावत यांना जयंती निमित्त गोखले यांना श्रद्धांजली वाहायची होती. रावत यांनी ती वाहिलीही. पण, ही श्रद्धांजली वाहात असताना रावत यांनी गोखले यांच्या ऐवजी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) यांचा फोटो वापरला आहे. ही पोस्ट त्यांनी थेट ट्विटरवरही शेअर केली आहे. त्यामुळे हरीश रावत हे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत.

आपल्या @harishrawatcmuk या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हरीश रावत यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ही श्रद्धांजली अर्पण करताना ' स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, समाज सुधारक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांना शत शत नमन आणि विनम्र श्रद्धांजली', असे म्हटले आहे. सोबतच रावत यांनी #GopalKrishnaGokhale हा हॅशटॅगही दिला आहे. मात्र, रावत यांनी पोस्टसोबत जो फोटो शेअर केला आहे तो फोटो गोखले यांचा नसून लोकमान्य टिळकांचा आहे. त्यामुळे सोशल मीडियात हरीश रावत हा सध्या थट्टेचा विषय ठरले आहेत. तर, रावत यांना एकत गोखले माहित नसावेत किंवा त्यांना लोकमान्य टिळक यांचे नाव महिती नसावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, Yearender 2018: वर्षाअखेरीस सर्वाधिक ट्रोल झालेल्या यादीत 'या' मराठी कलाकाराचे नाव झळकले)

गोपळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक नावाच्या खेड्यात झाला. तर त्यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येते गेले. कोल्हापूर येथेच बालपणीचे शिक्षण सुरु असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे झाले. पुढे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.

विशेष म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमांतून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय, समाजिक, सांस्कृतिक इतिहासात गोखले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.