सोशल मिडिया वापराचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. आजकाल यातील सगळ्यात मोठा तोटा म्हणजे ‘खोट्या बातम्यांचा सूळसुळाट’ (Fake News). याआधी कोरोना विषाणू, लसीकरण, कोरोना औषधे यांबाबत अनेक खोटे मेसेजेस व्हायरल झाले आहेत. देशात मुलींसाठी विविध योजना चालवल्या जातात. मुलींच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण आणि लग्नापर्यंत, केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांतर्गत मदत करतात. आता एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला गेला आहे की, प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेच्या अंतर्गत सरकार मुलींना दरमहा 2000 रुपये देत आहे.
कदाचित तुम्ही पहिल्यांदाच अशा योजनेचे नाव ऐकत असेल. तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही असा मेसेज आला असेल, ज्यात या योजनेबद्दल सांगितले गेले असेल. आपण YouTube चॅनेलवर या योजनेबाबत व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये सांगितले आहे की सरकार मुलींना दोन हजार देत आहे. आता या दाव्यात कितपत सत्य आहे याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सरकारी माहिती एजन्सी PIB अर्थात प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने हा दावा फेटाळला आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून या व्हायरल मेसेजची योग्य माहिती दिली आहे. हा दावा खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की जेव्हा सरकार अशी कोणतीही योजनाच चालवत नाही, तेव्हा लाभ मिळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजेच हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. (हेही वाचा: देशात विक्रमी कोरोना लसीकरण झाल्याच्या आनंदात सरकार देत आहे मोफत 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)
दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.