Fact Check: भारतामध्ये 12 वर्षांवरील मुलांना Bharat Biotech च्या COVAXIN वापराला मिळाली मंजुरी? जाणून घ्या वायरल मेसेज मागील PIB ने सांगितलेलं सत्य
COVAXIN For Kids Fake Report| Photo Credits: Twitter/ PIB Fact Check

भारतामध्ये कोरोना वायरसची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असतानाच आता तज्ञांनी तिसर्‍या लाटेचा धोका बोलून दाखवला आहे. यामध्ये लहान मुलांना जपण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता सोशल मीडीयामध्ये भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) 'कोवॅक्सिन' (COVAXIN) चे डोस 12 वर्षांवरील मुलांना देण्यात येतील अशा आशयाचे मेसेजेस फिरत आहेत. पण हा दावा खोटा असल्याचं PIB कडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान भारतात अजूनही 12 -18 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण खुले केले नसल्याचंही पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) सांगितले आहे.

भारतामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण वेगवान केले जात आहे. सध्या 18 वर्षांवरील सार्‍यांनाच लस टोचून घेण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे. पण वॉर व्हर्सेस वायरस मध्ये आता लसीकरण हे शस्त्र म्हणून वापरले जाणार असले तरीही अद्याप 18 वर्षांखालील नागरिकांसाठी नसेल. लहान मुलांसाठी अद्याप लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये सुरू झालेला नाही. दरम्यान परदेशात फायझर ची लस लहान मुलांना देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. नक्की वाचा: Fact Check: खूप वेळ मास्क घातल्याने शरीरात निर्माण होते ऑक्सिजनची कमतरता? PIB ने सांगितले तथ्य.

पीआयबी फॅक्ट चेक ट्वीट

भारतामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन या दोन प्रमुख लसी उपलब्ध आहेत. मात्र भारतात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने लसीकरणामध्ये अनेक ठिकाणी वेग मंदावला आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे नुकतेच काही दिवसांपूर्वी अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतीय बनवटीची ही लस कोरोना वायरसच्या म्युटंट्स वर देखील परिणामकारक असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा आता या लसीकडे ओढा वाढला आहे.

कोरोना संकटकाळात नागरिकांच्या मनातील भीतीचा फायदा घेत काही खोट्या बातम्या, दावे झपाट्याने वायरल होत आहेत. पण नागरिकांनी सरकारी सूत्रांकडून माहिती दिल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या खोट्या लिंक्सच्या माध्यमातून वैयक्तिक माहितीवर डल्ला मारला जात असल्याचं देखील उघड झालं आहे.