मासे व आंबे (प्रातिनिधिक प्रतिमा)

कोकणातील (Konkan) रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) आंबा, मासे आणि मीठ उद्योगांना मोठा फटका बसला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मे महिन्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना, पश्चिमी वादळ प्रणाली आणि अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे आंब्याच्या बागा, मासे सुकवण्याचे व्यवसाय आणि मीठ उत्पादनाला तीव्र नुकसान झाले. कोकणातील स्थानिक नागरिक आणि शेतकरी गटांनी या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी मदतीची मागणी केली आहे. या पावसामुळे शेतकरी, मच्छीमार आणि मीठ उत्पादक यांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे.

अनपेक्षित हवामानाच्या घटनांमुळे आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सुक्या माशांचे उत्पादन विस्कळीत झाले आहे आणि विशेषतः मुंबई, कोकण आणि किनारी भागात मीठ उत्पादनाच्या कामांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे नागरिकांच्या गट द वॉचडॉग फाउंडेशनने म्हटले आहे.

आंबा उद्योगावर परिणाम-

कोकण हा अल्फोन्सो (हापूस) आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे, ज्याची देश-विदेशात मोठी मागणी आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील आंब्याच्या बागांना या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मे महिन्यात आंबे पिकण्याच्या अंतिम टप्प्यात असतात, आणि या वेळी पडलेल्या पावसामुळे फळे खराब झाली, फांद्या तुटल्या आणि फळांचा तुटवडा निर्माण झाला. शेतकऱ्यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे आंब्यांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला, ज्यामुळे 30-40% फळे खराब झाली.

मासे सुकवण्याच्या व्यवसायावर परिणाम-

कोकणातील मच्छीमार समुदाय, विशेषतः रायगड आणि रत्नागिरीतील मच्छीमार, यांना मासे सुकवण्याच्या व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागले. मासे सुकवण्याची प्रक्रिया पूर्णपणे सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे, आणि अवकाळी पावसामुळे मासे सुकवण्यासाठी बांबूच्या उंच मचाणांवर ठेवलेले मासे भिजले. यामुळे मासे खराब झाले. मच्छीमारांनी सांगितले की, मासे सुकवण्यासाठी पुरेशी स्टोरेज सुविधा नसल्याने पावसाच्या वेळी मासे वाचवणे अशक्य आहे. याशिवाय, या पावसामुळे मासेमारीचे प्रमाणही कमी झाले, कारण जोरदार वारे आणि खराब हवामानामुळे बोटी समुद्रात जाऊ शकल्या नाहीत. परिणामी, बाजारात सुक्या माशांचा पुरवठा कमी झाला, आणि किंमती 15-20% वाढल्या.

मीठ उत्पादनाला फटका-

कोकणातील रायगड आणि पालघर येथील मीठ उत्पादन हा आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे, जो या पावसामुळे प्रभावित झाला आहे. मीठ उत्पादनासाठी मे महिना हा महत्त्वाचा असतो, कारण यावेळी सूर्यप्रकाश तीव्र असतो आणि मीठ तयार करण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन जलद होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे मीठ उत्पादनासाठी तयार केलेल्या मिठागरांमध्ये पाणी साचले, आणि तयार मीठ भिजून खराब झाले. मीठ उत्पादकांनी सांगितले की, पावसामुळे खराब झालेले मीठ पुन्हा वापरता येत नाही, आणि यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवसांसाठी हवामानात मोठे बदल; अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज)

अशाप्रकारे हवामान बदलामुळे कोकणातील पारंपरिक व्यवसायांवर वाढता धोका निर्माण झाला आहे, आणि यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. वॉचडॉग फाउंडेशनने सरकारला आंब्याच्या बागा, सुक्या माशांच्या साठ्यांचे आणि मिठागरांचे किती नुकसान झाले आहे याचे सर्वेक्षण (पंचनामे) करावेत आणि बाधित शेतकरी आणि उत्पादकांना पुरेशी भरपाई द्यावी अशी विनंती केली आहे.