मराठा आरक्षण ( Maratha reservation) मुद्द्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला विशिष्ट मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीने अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांची झालेली भेट या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकार आणि जरांगे यांच्यात बोलणे सुरु असण्याची शक्यता आहे. चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला तर आनंदच आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेली भेट ही पूर्णपणे अराजकीय होती. या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ लिहीला होता. या ग्रंथाला आता 100 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या शताब्दी कार्यक्रमास विविध मान्यवरांची भाषणे होती. ज्यात माझाही समावेश होता. तसेच, कुमार केतकर आणि प्रकाश आंबेडकर यांचीही भाषणे होती. त्यामुळे या भेटीत याच कार्यक्रमाच्या बाबतीत चर्चा झाली, असे पवार म्हणाले.
दरम्यान, इंडिया आघाडी किंवा महाविकासआघाडीमध्ये जर कोणी आणखी मित्रपत्र वाढत असेल, येत असेल तर आम्हाला आनंद आहे. मात्र, त्याचा निर्णय मी एकटा घेत नाही. आमच्यातील इतरही पक्षातील प्रमुख मंडळी, नेते चर्चा करतात आणि त्यावर निर्णय होईल, असे पावर म्हणाले.
शरद पवार यांनी या वेळी राज्यात दुष्काळी स्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. अशा वेळी चिंतेची बाब आहे. राज्य सरकारने त्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत. कंत्राटी भरती संदर्भात या आधी जो काही निर्णय झाला. त्या निर्णयात भाजप आमच्या सोबत होता. मात्र, आता काही लोक ते विसरले आहेत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी जोरदार टोला लगावला. ज्यांना पक्षाने तिकीट नाकारले अशा लोकांबाबत काय बोलायचे, असे म्हणत पवार यांनी अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि कुटुंबीय एका व्यासपीठावर येणार आहेत. याबाबत विचारले असता होय, राजकीय भूमिका आणि कौटुंबीक कार्यक्रम वेगळे असतात. माझे वडील अनंतराव पवार यांच्या नावाने आम्ही एक संस्था काढतो आहोत. या संस्थेच्या कार्यक्रमासाठी कुटुंबीयांनी येणे आवश्यक होते. त्यामुळे ते येतील असे पवार म्हणाले.