काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi On Sharad Pawar) यांनी आज (18 ऑक्टोबर) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत उद्योगपती गौतम अदाणी ( Rahul Gandhi On Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार प्रहार केला. दरम्यान, इंडिया आघाडीतील घटकपक्ष आणि देशातील बडे नेते शरद पवार यांचे अदाणी यांच्यासबत असलेले संबंध भेटीगाठी यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नालाही राहुल यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. अदानी आणि पवार यांच्यातील संबंधांबाबत विचारले असता गांधी म्हणाले, सध्या देशाचे पंतप्रधान शरद पवार नाहीत नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे अदाणी मुद्द्यावरुन मी त्यांना नव्हे तर पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारतो.
राहुल गांधी यांनी जोर देत म्हटले की, पंतप्रधान पदावर असलेले नरेंद्र मोदी हेच खरे मिष्टर अदानी आहेत. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान अथवा कोणतेही मंत्री नाहीत. त्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारत नाही. जर ते सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असते तर मी त्यांना नक्कीच प्रश्न विचारला असता, असे ते म्हणाले. देशाच्या गरीब जनतेच्या खिशातून पैसा काढायचा आणि तो बळकावयचे धंदे सध्या सुरु आहेत. फायनान्शिअल टाइम्सचा हवाला देत राहुल यांन हल्ला चढवत म्हटले की, अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि तो भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते. आमच्या विजेच्या किमती वाढत आहेत. कारण हे सर्व प्रकल्प अदानींचा कोळसा खरेदी करतात. ज्यामुळे वीजेचे दर वाढतात. इतकेच नव्हे तर ही विज वापरणारे लोक गरीब असतात. त्यांना वीजेचे दर का वढतात हे लक्षातही येत नाही. ही सरळ सरळ चोरी आहे.
देशातील जनतेच्या खिशातून होणाऱ्या चोरीतून पैसे थेट अदानींच्या खिशात जातात. देशातील जनता जेव्हा घरात विजेचे बटन दाबते तेव्हा त्याचे पैसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अदानींच्या खिशात जातात. ही चोरी जनतेच्या खिशातून होत आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये चौकशी होत आहे आणि लोक प्रश्न विचारत आहेत पण भारतात काहीच होत नाही. भारतात कोणी प्रश्न विचारत नाही. कोणी विचारलाच तर प्रसारमाध्यमांतुन एक ओळही येत नाही, अशी नाराजीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
व्हिडिओ
#WATCH | When asked why he is not raising questions about Sharad Pawar's meeting with Adani despite INDIA alliance united on Adani issue, Congress MP Rahul Gandhi says, " I have not asked Sharad Pawar, he is not the Prime Minister of India. Sharad Pawar is not protecting Adani,… pic.twitter.com/Yak56drO0g
— ANI (@ANI) October 18, 2023
राहुल गांधी यांनी नेहमीच अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांबाबत थेट टीका केली आहे. त्यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेतही अदानींच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित केले होते. एकदा तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा विमानातील फोटोही झळकावला होता. त्यावरुन संसद सभागहातही जोरदार हंगामा झाला होता.