आजही आठवते 2005 सालच्या पुरावेळची या तीन बड्या नेत्यांची धडाकेबाज कामगिरी; स्वतः पाण्यात उभे राहून लोकांना काढले होते बाहेर
आर.आर.पाटील, पतंगराव कदम,. मदन पाटील (संग्रहित-संपादित प्रतिमा)

कोल्हापूर. सांगली. सातारा महाराष्ट्रातील तीन महत्वाचे जिल्हे आज पुराच्या विळख्यात आहेत. कोल्हापूरला चहूबाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे. सांगलीत संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली आहे. इकडे जवळजवळ संपूर्ण कराडमध्ये पाणी शिरलय. आसपासच्या गावात अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होत आहे, मात्र दुसरीकडे  ब्रह्मनाळ येथील दुर्दैवी घटने सारख्या घटनाही घडत आहेत. या पुरात कित्येक संसार उघड्यावर पडले, कित्येकांना नव्याने आयुष्य सुरु करावे लागेल मात्र गेलेला जीव परत येणार नाही. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून आले, पाहणी केली, चार योजना तोंडावर मारल्या बस. आज तर गिरीश बापट यांनी कहरच केला. इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये हा नेता असे कसे वागू शकतो? याउपर म्हणजे जिल्हा पुरात रडत असताना त्याचे पालकमंत्री अश्रू पुसायला नसावेत? होय, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील गायब आहेत.

अशा परिस्थितीत आठवण येते ती 2005 सालच्या पुराची (2005 Sangli Flood). तेव्हाही असेच पाणी सांगलीत शिरले होते. कृष्णेची पातळी 57 इंच झाली होती, पाहता पाहता आजूबाजूंच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी जिल्हातील नेते मंडळी कुठे होती? तर स्वतः कमरेभर पाण्यात उभे राहून आर.आर.पाटील (R.R.Patil), पतंगराव कदम (Patangrao Kadam), मदन पाटील लोकांना बाहेर काढायचे काम करत होते. भिलवडी-वांगी हा पतंगराव कदम यांचा मतदारसंघ. त्यावेळी ते मंत्रीदेखील होते. पुराचा फटका या गावांना सर्वात जास्त बसला होता, त्यावेळी पतंगराव कदम स्वतः गावोगावी फिरत सेवा सुविधेंची सोय करत होते. कुठल्या गावात किती माणसे अडकली आहेत, कोणाला कसे बाहेर काढायचे याचा हिशोब ते मनाशी करत होते.

त्यावेळी आजच्यासारखे मोबाईलचे प्रस्थ नव्हते. मात्र या तीनही नेत्यांना गावातली गल्ली बोळ माहिती होती. कुठे, किती, कशी माणसे पाठवायची, बोटी पाठवायच्या याची अजूक जाण होती. योग्य वेळेत पुराने वेढलेली गावे रिकामी होत होती. फक्त माणसेच नाही तर जनावरांनाही या पुरातून वाचवण्याचे प्रयत्न चालू होते. आज ब्रह्मनाळमध्ये जी घटना घडली, मागच्या पुरात त्याच गावातली माणसे पहिल्यांदा बाहेर काढण्यात आली होती. दिवसभर स्वतः फिरून लोकांना बाहेर काढायचे आणि त्यांना सुरक्षित स्थळी चहा नाश्ता द्यायचा, त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करायची ही कामे स्वतः मदन पाटील यांनी केली आहेत. (हेही वाचा: Maharashtra Flood: महाराष्ट्रात पुराने एका आठवड्यात घेतले 30 बळी, 2 लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर)

आर. आर. पाटील त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. एका गावातील 10 जणांना वाचवायला ते स्वतः रेस्क्यू टीमसोबत त्या गावी गेले होते. पाण्याचा वेढा पडल्यावर एक माणूस रात्रभर झाडावर बसून आहे ही माहिती मिळताच आबांनी एका माणसासाठी हेलिकॉप्टर पाठवले होते. इतकी वाईट परिस्थिती असूनही पुढे अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग होत नव्हता. आर. आर. पाटलांनी कर्नाटक सरकारला विनंती केली, त्यास मान दिला नाही तर सज्जड दम भरला आणि नवीन बांधलेल्या अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग होऊ दिला. इतकेच नाही तर कर्नाटक सरकार जितका सांगितला आहे तितकाच विसर्ग करत आहे की नाही पाहण्यासाठी पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते. तर अशा या 2005 सालच्या महापुरात या तीन नेत्यांनी एकही व्यक्ती काय पण जनावराचाही प्राण जाऊ दिला नव्हता. आजही सांगली जिल्ह्यातील तमाम मंडळी या तिघांची आठवण काढून म्हणतात ‘हे तिघे असायला हवे होते’.  (बोल भिडूने यावर विस्तृत बातमी केली आहे)