Maharashtra Flood: महाराष्ट्रात पुराने एका आठवड्यात घेतले 30 बळी, 2 लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर
Mumbai Monsoon 2019 | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात मागील आठवड्यात पुणे(Pune), नाशिक(Nashik), सांगली (Sangali), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur)  व अन्य अनेक ठिकाणी पुरामुळे झालेल्या दुर्दशेची आकडेवारी मांडणारा एक अहवाल आज, 9 ऑगस्ट रोजी मांडण्यात आला. ज्यानुसार, अवघ्या सात दिवसात महाराष्ट्रात पुरामुळे ठिकठिकाणी 30 जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे दोन लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत कोकण विभागाचे आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या माहितीनुसार,राज्यात वेगवेगळ्या प्रसंगी सांगली मध्ये 12 जणांचा, कोल्हापुरात 4, साताऱ्यात 7, पुण्यात 6, तर सोलापूर येथे एकाचा  मृत्यू झाल्याचे समजत आहे. दरम्यान सांगलीतील ब्रम्हनाळ येथे साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी नेत असताना बोट उलटली होती ज्यात 16 जण बुडले होते, यातील चार पाच जण अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे ही मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर ओढवलेल्या या संकटाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर मधून पूरग्रस्त प्रदेशाची पाहणी केली होती. यावेळी जवळपास 29 हजार नागरिक अजूनही पुरात अडकल्याची माहिती समोर आली होती. या नागरिकांच्या बचावकार्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत हवाई मार्गाने बचावकार्यात अडथळा येत असल्याने गुरुवारी नौदलाची 12 खास पथके सांगली येथे रवाना झाली आहेत. कोल्हापूर येथील पूरस्थितीचे गांभीर्य विसरुन गिरिश महाजन सेल्फी घेण्याच्या नादात, राज ठाकरे यांनी केली टीका

राज्यात प्रमुख ठिकाणी आलेल्या पुराचा परिणाम, मुंबई सह अन्य शहरांवरही झाला आहे. पुरामुळे स्थानिक व्यवसाय ठप्प झाल्याने साहजिकच मुंबईमध्ये होणार दूध, भाजीपाल्याचा पुरवठा खंडित झाला आहे, परिणामी या गोष्टींचे दर वाढले आहेत.