भीमा-कोरेगाव लढ्याचा (Bhima Koregaon Battle) इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हवा. त्यामुळे तो सर्व मुलांना कळेल, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. आज सकाळी रामदास आठवले यांनी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (काय आहे भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास? नेमकं काय घडलं होतं 1 जानेवारी 1818 रोजी? जाणून घ्या)
तसंच दलितांवरील अत्याचार थांबून दलित-सवर्ण यांना जोडण्यासाठी देशात समता नांदायला हवी. तसंच त्यांच्यातील गैरसमज दूर होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. गैरसमज दूर झाल्याने गावांमध्ये एकी निर्माण होईल आणि देशाचा झपाट्याने विकास होईल, हा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असेल असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, रामदास आठवले यांनी त्यांच्या नववर्ष संकल्पाबद्दलही सांगितले. त्याबद्दल बोलताना आठवले म्हणाले की, नव्या वर्षात रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा संकल्प मी केला आहे. यासाठी मी रिपब्लिकन अशी आमची घोषणा असेल.
कोरोना संकटातून सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे ठोस योजना नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. या टीकेला ही आठवले यांनी उत्तर दिले आहे. राज्याकडे कोणताही प्लॅन नसला तरी कोलमडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण? उद्धव ठाकरे की अजित पवार? हे एकदा स्पष्ट करा; प्रकाश आंबेडकर यांची टीका)
दरम्यान, आज भीमा-कोरेगाव च्या लढाईला 203 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांसह आदी मान्यवरही उपस्थित होते.