1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला 200 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त दलित समाजातील लोक एकत्र जमले असताना कार्यक्रमात दंगल उसळली आणि 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे भीमा-कोरेगावकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. मात्र भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास नेमका काय? या दिवशी शौर्य दिन का साजरा केला जातो? हे अनेकांना ठाऊक नाही. त्यामुळे भीमा-कोरेगावच्या 203 वर्षपूर्ती निमित्त जाणून घेऊया विजयस्तंभाचा इतिहास... (भीमा कोरेगाव लढाई, इतिहास, विजय स्तंभ आणि दलितांचे शौर्य: ठळक मुद्दे)
भीमा नदीच्या किनारी वसलेले कोरेगाव म्हणून याला भीमा-कोरेगाव म्हटले जाते आणि तेथे विजयस्तंभ उभारला गेल्याने त्याला भीमा-कोरेगाव विजयस्तंभ म्हणून प्रचलित आहे.
ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीचे कॅप्टन. एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या केवळ 500 सैनिकांनी 28000 पेशवा सैन्याचा पराभव केला. तो दिवस होता 1 जानेवारी 1818. त्यामुळे महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या विजयस्तंभाला भेट दिली.
महाराष्ट्रात पेशवाई आल्यानंतर सेनादलात महार समाजाला अस्पृश्यतेची वागणूक देण्यात आली. त्यामुळे या जाती-जमातीतील लोकांना देखील अस्मितेने वागवेल जावे, अशी वारंवार विनंती पेशव्यांकडे करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत राहिले. त्यामुळे महार समाज त्वेषाने पेटला आणि पेशव्यांविरुद्ध ब्रिटिशांना साथ दिली. दरम्यान, ही लढाई मराठा नाही ब्राह्मणांविरुद्ध असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. तसंच महार समाजाला देण्यात आलेली अस्पृश्यतेची वागणूक थांबली असती तर ही लढाई झालीच नसती, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
भीमा-कोरेगावची लढाई म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले पहिले बंड होते आणि त्याच लढाईत महार समाजाला यश मिळाले. म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाची आठवण म्हणून अजूनही आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला भेट देतात.