Bhima Koregaon 202nd Anniversary: भीमा कोरेगाव लढाई, इतिहास, विजय स्तंभ आणि दलितांचे शौर्य: ठळक मुद्दे
Koregaon Bhima | (Picture courtesy: Wikipedia)

Bhima Koregaon 202nd Anniversary: भीमा कोरेगाव लढाईस 1 जानेवारी 2018 रोजी 200 वर्ष पूर्ण झाली. गेली दोन शतकं ही लढाई इतिहासाच्या पानांतून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. गेली अनेक वर्षे या लढाईवर साधक-बाधक चर्चा होत आहेत. या चर्चेने हिंसेची पातळी कधीच गाठली नाही. मात्र, 1 जानेवारी 2018 या दिवशी ती घटना घडली. भीमा-कोरेगाव हिंसाचार (Bhima-Koregaon Violence) घडला. त्यावरुन राजकारण तापले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अनेकांनी तत्कालीन आणि दुरगामी फायद्यातोट्यांसाठी या हिंसाचाराचा वापर केला. यात समाजाची विण मात्र उसवली गेली. इतिहासांच्या पानांतून जाणून घेऊया 200 वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) इथे काय घडलं होतं. काय आहे हा इतिहास.

पेशवे-इंग्रज लढाई

दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यात 1 जानेवारी 2018 या दिवशी लढाई झाली. ही लढाई भीमा कोरेगाव इथे झाली. पुण्यावर तेव्हा ब्रिटिशांनी आपली सत्ता प्रस्तापीत केली होती. त्यामुळे बालेकिल्ला असलेले पुणे हे पेशव्यांच्या हातून निसटले होते. आपल्या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्तापीत करावे यासाठी पेशव्यांनी तयारी केली. पेशव्यांचे सुमारे 28 हजार इतके मनुष्यबळ असलेले सैन्य पुण्यावर चालून गेले. इंग्रजांना पेशव्यांच्या हालचालींची खबर लागली. पेशव्यांशी सामना करायचे ठरवून ब्रिटीशांनीही आपली फौज मैदानात उतरवली. पेशव्यांच्या विरोधात इंग्रजांकडे त्या वेळी केवळ 800 इतके सैनिक होते असे सांगतात. पण, दोन्ही बाजूंकडे त्या वेळी असलेल्या सैन्यांचा आकडा हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सांगितला जातो. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील सैन्याच्या संख्येचा नेमका आकडा कळत नाही. कॅप्टन फ्रांन्सिस एफ. स्टॉन्टन हे ब्रिटीशांच्या सैन्याचे नेतृत्व करत होते.

भीमा नदी काठावर तुंबळ युद्ध

पेशव्यांचे सैन्य आणि ब्रिटीशांचे सैन्य पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे आमनेसामने आले. भीमा नदीच्या काठावर दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झालं. ब्रिटीशांच्या सैन्याचे वैशिष्ट्य असे की, ब्रिटीशांच्या सैन्यात तब्बल 500 महार सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सेनेला एक-दोन नव्हे तर, तब्बल 12 तास रोखून धरले. ब्रिटीश सैन्यापुढे पेशव्यांच्या सैन्याला इंचभरही पुढे सरकता येत नव्हते. दरम्यान, ब्रिटीश सैन्याची आणखी कुमक घेऊन येत आहेत अशी माहिती पेशव्यांना मिळाली. त्यामुळे पेशव्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला, असा दाखला इतिहासकार देतात.

माहर सैनिकांचे शौर्य आणि भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ

सांगितले जाते की, भीमा नदीतिरी झालेल्या या लढाईत ब्रिटशांचे सुमारे 2075 तर पेशव्यांचे सुमारे 600 सैनिक ठार झाले. पेशव्यांविरुद्धची लढाई ब्रिटीशांनी जिंकली. 1 जानेवारी 1818 च्या पहाटेला ही लढाई जिंकली गेली. ब्रिटीशांच्या बाजूने लढताना महार सैनिकांनी शौर्यपूर्ण कामगिरी केली. या कामगिरीमुळेच ब्रिटीशांना हा विजय मिळू शकला. या विजयाचे प्रतिक म्हणून ब्रिटीशांनी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ उभारला. या स्तंभावर पेशव्यांसोबतच्या लढाईत ठार झालेल्या सैनिकांची नावे कोरण्यात आली. हा विजयस्थंब आजही भीमा कोरेगाव येथे उभा आहे.

दरम्यान, पेशव्यांच्या काळात दलितांना प्रचंड अपमानास्पद वागणूक मिळाली. इतिहासात या वागणूकीचे दाखले क्रौर्य वाटावे इतके भयान आहेत. इतके की दलितांना पेशव्यांच्या राजवटीत मुलभूत अधिकारही नाकारण्यात आले. या अपमानाचीच सल दलितांच्या मनात प्रचंड होती. पेशवाईत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच महार सैनिकांनी पेशव्यांविरोधात ब्रिटीशांना मदत दिली. प्राणांची बाजी लाऊन ते भीमा कोरेगावची लढाई लढले. यात ते विजयीही झाले. त्यामुळे भीमा-कोरेगाव लढाई आणि भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ याकडे पाहण्याचा दलितांचा दृष्टीकोन वेगळा आहे. या दृष्टीकोनाला सामाजिक, आर्थिक आणि मान-सन्मानाच्या भावभावनांचे अनेक पदर आणि कंगोरे आहेत.