मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र या भागात दुष्काळामुळे (Drought) बिकट झालेल्या परिस्थितीमुळे शेतकर्यांच्या आत्महत्या, कुपोषित बालकं, बकाल जीवन, एन तारूण्यात वैधव्य आलेल्या मुली याबाबतच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील पण ग्रामीण भागात दुष्काळासमोर हतबल झालेल्या अनेकींनी स्वतःचं गर्भाशय (Uterus) काढून टाकण्याइतपत टोकाचं पाऊल उचललं आहे. दुष्काळग्रस्त भागातील अनेक महिलांनी केवळ ऊस तोडणीचं काम करून वर्षाभराचं अर्थाजन करता यावं यासाठी गर्भाशय काढून टाकलं आहे.
Business Line च्या रिपोर्टनुसार, वंजारीवाडी येथील निम्म्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गर्भाशय काढून टाकलं आहे.त्यांच्यामते 2-3 मुलांनंतर असं करणं हा गावातील अलिखित नियमच आहे.गावातील महिला प्रामुख्याने ऊस कापणीचं काम करतात. दुष्काळाच्या भागात प्रामुख्याने महिला कामासाठी वणवण असतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा या महिलांसाठी ऊस तोडणीच्या कामासाठी ज्या महिलांना कामगार म्हणून घेतलं जातं त्या महिलांमध्ये प्रामुख्याने गर्भाशय काढलेल्या महिलांना प्राधान्य दिलं जातं.
दरवर्षी दुष्काळग्रस्त भागातून लाखो स्त्री-पुरूष स्थलांतर करतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात हे प्रमाण अधिक असतं. मुकादम व्यवहार करताना प्रत्येक जोडप्याला 'एक' असा व्यवहार करतो. कामातून पुरूष किंवा स्त्री यापैकी एकालाही सुट्टी घ्यायची असल्यास 500 रूपये दंड आकारला जातो.
मासिकपाळी हा स्त्रियांसाठी अडथळा
ऊस तोडणीचं काम हे अत्यंत कष्टाचं काम आहे. मासिकपाळीदरम्यान कामात खंड पडू नये अनेक महिला स्वतःहून शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गर्भाशय काढून टाकतात. यामुळे मासिकपाळी थांबते. त्यामुळे दरमहा भुर्दंड वाचतो. मुकादमच्या मते मासिकपाळी दरम्यान अनेक स्त्रिया किमान 1-2 दिवस सुट्टी घेतात.
ऊस तोडणीसाठी प्रत्येकी 250 रूपये मिळतात. दिवसभरात प्रत्येकी सुमारे 3-4 टन ऊस तोडणी केली जाते तर एका हंगामात 4-5 महिन्यात जोडप्याकडून अंदाजे 300 टन ऊस तोडला जातो.
या कामगारांना वर्षभराची आर्थिक जुळवाजुळव याच 4-5 महिन्यात करायची असते. त्यानंतर कामगारांना काम नसतं. महिलांना, पुरूषांना कोणत्याच शारिरीक त्रासासाठी सुट्टी घेण्याची परवानगी नसते.
ग्रामीण भागात स्वच्छतागृहांची पुरेशी सोय नाही. साध्या पोटदुखी किंवा अंगावरून पांढरं जाणं अशा समस्यांवरही स्थानिक वैद्य महिलांना गर्भाशय टाकण्याचा सल्ला देतात.
महिलांच्या शरीरातून गर्भाशयाचा कॅन्सर किंवा फॅब्रॉईड सारख्या गंभीर आजारांदरम्यान धोका टाळण्यासाठी गर्भाशय काढले जाते. मात्र याव्यक्तिरिक्त मुद्दामून गर्भाशय काढल्याने महिलांमध्ये हार्मोन्सचं असंतुलन, नैराश्य, वजन वाढणं यासारखे दुष्परिणाम दिसून येतात.