
भारतामध्ये समलैंगिक लोकांच्या नात्याला (Gay Relation) कायद्याने मान्यता मिळण्याबाबत लढाई सुरु असताना आता, स्पेनमध्ये INVOCell तंत्राद्वारे पहिल्यांदाच एका लेस्बियन जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे. युरोपच्या इतिहासात अशा प्रकारे समलिंगी जोडप्याने मुलाला जन्म देण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिपोर्टनुसार, INVOCell तंत्राद्वारे जन्माला आलेल्या डेरेक एलॉय (Derek Eloy) नावाच्या मुलाचा जन्म 30 ऑक्टोबर रोजी पाल्मा, मेजोर्का, स्पेन येथे झाला. या मुलाला 30 वर्षीय एस्टेफानिया (Estefania) आणि 27 वर्षीय अजहाराला (Azahara) या दोघींनी जन्म दिला आहे.
अजहाराने मुलाला नऊ महिने आपल्या पोटात वाढवले, परंतु त्याला जन्म देणारी अंडी एस्टेफानियाच्या गर्भातून आली होती. अशाप्रकारे या मुलाला जन्मापूर्वी दोन्ही मातांच्या पोटी राहण्याची संधी मिळाली. लहान डेरेक एलॉयचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याचे वजन 7 पौंड 4 औन्सपेक्षा जास्त होते.
या जोडप्याने स्पेनमधील एका प्रजनन क्लिनिकच्या मदतीने यावर्षी मार्चमध्ये पालक होण्याचा प्रवास सुरू केला. एस्टेफानिया आणि अझहारा यांनी गर्भधारणेसाठी INVOcell नावाचे प्रजनन तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले. INVOCell हे इंट्राव्हॅजाइनल कल्चर (IVC) द्वारे बाळ निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी सुरुवातीला एस्टेफानियाच्या योनीमध्ये अंडी आणि शुक्राणूंची एक कॅप्सूल टाकण्यात आली. अंडी आणि शुक्राणूंची कॅप्सूल 5 दिवसांपर्यंत तिथे ठेवली गेली, ज्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे सोपे झाले.
त्यानंतर कॅप्सूल एस्टेफानियाच्या शरीरातून काढून पुढील विकासासाठी अझहाराच्या गर्भाशयात स्थानांतरित केली गेली. त्यापूर्वी भ्रूणाची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी गर्भधारणेच्या या पुढील टप्प्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेतली. अशाप्रकारे डेरेकला जन्म देणारी अंडी एस्टेफानियाच्या गर्भाशयात फलित झाली होती, परंतु अजहराने त्याला नऊ महिने तिच्या गर्भाशयात ठेवले आणि 30 ऑक्टोबर रोजी सी-सेक्शनद्वारे डेरेक एलॉयला जन्म दिला. (हेही वाचा: Thailand Recognises Same-Sex Marriage: थायलंड सरकारने दिली समलिंगी विवाहाला मान्यता; विवाह समानता विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी)
या कालावधीत, एस्टेफानिया आणि अजहाराला यांना संपूर्ण प्रक्रियेत 4,57,909 रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. डेरेकचा जन्म शक्य करणार्या टीममधील एका डॉक्टरने सांगितले की, या (INVOCell) प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पालक भ्रूण आपल्या पोटामध्ये ठेऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार ते एकमेकांसोबत शेअर करू शकतात. डेरेक हे INVOcell वापरून जन्माला आलेले युरोपमधील पहिले आणि जगातील दुसरे बाळ ठरले आहे. हे तंत्र यापूर्वी 2018 मध्ये टेक्सासमधील ब्लिस आणि अमेरिकेच्या अॅशले कुल्टर यांच्या मुलाच्या जन्मासाठी वापरले गेले होते.