Nuclear submarine (PC- Twitter)

भारत दहशतवादाला समर्थपणे तोंड देण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. आता भारताच्या सागरी सीमा अधिक सुरक्षित होणार आहेत. पश्चिम समुद्री ताफ्यात लवकरच नवी आण्विक पाणबुडी (Nuclear submarine) दाखल होणार आहे. यासंदर्भात भारत आणि रशियात करार अंतिम टप्प्यात आला आहे. भारताने रशियाकडून खरेदी केलेली ही पाणबुडी या महिन्यात नौदलात दाखल होणार आहे. ही पाणबुडी मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम कमांडमध्ये तैनात होण्याची शक्यता आहे.

भारताकडे सध्या फक्त 2 आण्विक पाणबुड्या आहेत. यात 'आयएनएस अरिहंत' आणि 'आयएनएस चक्र' या पाणबुड्यांचा समावेश आहे. या दोन्ही पाणबुड्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर तैनात आहे. पंरतु, भारताला अरबी समुद्रातून मोठा धोका आहे. त्यामुळे या बाजूने एका पाणबुडीची आवश्यकता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताने रशियाकडून खरेदी केलेली पाणबुडी ही 'अकुला' श्रेणीतील आहे. या पाणबुडीचे नाव 'आयएनएस चक्र 3', असं आहे. या पाणबुडीसाठी भारत आणि रशिया दरम्यान 300 कोटी डॉलरचा करार झाला आहे. (हेही वाचा - नौदल होणार सक्षम, भारताला मिळणार 8 नवीन अँटी सबमरीन)

या पाणबुडीत अणू ऊर्जा तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे पाणबुडीला ऑक्सिजन घेण्यासाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर येण्याची गरज नाही. भारतामध्ये 1970 पासून आण्विक पाणबुडीचा प्रयोग सुरू झाला. सध्या भारताकडे 14 पाणबुड्या आहेत. यातील 'आयएनएस चक्र' ही पाणबुडी सर्वात शक्तिशाली आहे. या पाणबुडीच्या साहाय्याने अण्वस्त्र हल्ला करणे शक्य आहे. 1987 मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस चक्र' ही रशियन पाणबुडी दाखल झाली होती.