छत्तीसगडला जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मास्क आणि जेवणाचे वाटप
Murlidhar Mohol, Mayor of Pune (PC - ANI)

पुण्याचे (Pune) महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आज छत्तीसगडला (Chhattisgarh) जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या गटाला मास्क आणि जेवणाचे वाटप केले. या कामगारांच्या दोन दिवसांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामगारांना आपल्या गावी पोहोचविण्यासाठी दोन बसची सुविधा करण्यात आली आहे. या कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात कामगार अडकले आहेत. या कामगारांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी विशेष श्रमिक ट्रेनही चालवण्यात येत आहेत. याशिवाय बसेसच्या माध्यमातूनही मजूरांना आपल्या राज्यात पोहोचवण्यात येत आहे. अशातचं लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या मजूरांना आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मास्क आणि जेवणाचे वाटप केले. तसेच त्यांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी 2 बस उपलब्ध करून दिल्या. (हेही वाचा - राज्यात दारुची ऑनलाईन बुकिंग आणि होम डिलिव्हरी करण्याचा सरकारचा विचार - नवाब मलिक)

दरम्यान, पुण्यात रविवारी 13 महिन्यांच्या बाळासह 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 151 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. पुणे शहरात रविवारी 102 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 482 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 1 हजार 318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.