Kavach कॉन्टॅक्टलेस चेंबर करणार जेजे रूग्णालय मध्ये कोविड 19 रूग्णांची ने-आण; सुरक्षित शुश्रूषेसाठी नवा पर्याय
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

कोरोनासोबत जगायला शिका हा मंत्र मिळाल्यापासून अनेकांनी वस्तूस्थिती स्विकारून त्याच्यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. अजूनही हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जात आहे. 'गरज ही शोधाची जननी' असते हे आता पुन्हा सिद्ध झालं आहे. मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये ( J J Hospital) आता कोविड 19 च्या रूग्णांची हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्टलेस ने-आण करण्यासाठी खास 'कवच' (Kavach) या ट्रान्सपोर्ट चेंबरची सोय केली आहे.

जेजे हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी डिपार्टमेंटने Indomed Devices च्या काही इंजिनियर्स सोबत येऊन हे 'कवच' ट्रांसपोर्ट चेंबर बनवले आहे. जेजे रूग्णालयामध्ये हॉस्टिटल स्टाफ, व्हिझिटर्स आणि अन्य रूग्ण यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचे इंफेक्शन पसरण्यापासून रोखण्यासाठी हे कवच बनवण्यात आले आहे.

PTI वृत्तसंस्थेशी बोलताना जेजे हॉस्पिटलअचे असिस्टंट प्रोफेसर अमोल वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी खर्चामध्ये बनवलेल्या ग्लास ट्रान्सपोर्ट ट्रॉलीमध्ये वरच्या बाजूला HEPA filter लावण्यात आला आहे. यामुळे 0.02 micronsइतके लहान पार्टिकल देखील फिल्टर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.

मुंबईमध्ये मागील सव्वा तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. अशामध्ये आता रोजच्या रोज हजारो आरोग्य यंत्रणे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकल्यास त्यांना लागण झाल्याने क्वारंटीन करावं लागत आहे. यामुळे आरोग्य कर्मचारी अपुरे पडत आहेत. 'पीपीई कीटमध्ये तासनतास राहून आरोग्य सेवा देणंदेखील कठीण होत असल्याने आता विज्ञान -तंत्रज्ञानाची मदत घेणं ही काळाची गरज बनली असल्याचं मत अमोल वाघ यांनी व्यक्त केले आहे.

जेजे रूग्णालयामध्ये सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांची ही कल्पना आहे. त्यांनी बोलताना असे सांगितले आहे की,' कवच ट्रॉली मुळे केवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नव्हे तर कमजोर रोगप्रतिकार शक्ती असणार्‍यांना आजूबाजूचे इतर संसर्ग होण्यापासुन देखील बचाव होऊ शकतो.

कवच मध्ये राहूनच रूग्णाच्या चाचण्या देखील होऊ शकतात. यामध्ये सोनोग्राफी देखील केली जाऊ शकते. आता पुढच्या टप्प्यामध्ये हे कवच चेंबर रूग्णावाहिकेमध्ये बसवण्याचं तसेच सीटी स्कॅन करण्यासाठी देखील त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो यासाठी प्रयत्न सुरू आहेत.