Cattle | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

गुरांना होणारा लम्पी (Lumpy) हा आजार महाराष्ट्रात अधिकच बळावताना दिसतो आहे. हळूहळू राज्यातील गुरांना (Lumpy Skin Disease In Maharashtra) तो आपल्या विळक्यात घेत आहे. एकापाठोपाठ एक अनेक जिल्ह्यांतील गुरे (Cattle) ही लंम्पी आजाराची (Lumpy Skin Disease) बळी ठरत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात 126 गुरांचा मृत्यू झाला असून 25 जिल्ह्यांमध्ये लम्पी व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने शनिवारी (17 सप्टेंबर) दिली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात 47, अहमदनगर जिल्ह्यात 21, धुळ्यात 2, अकोल्यात 18, पुण्यात 14, लातूरमध्ये दोन, सातारा जिल्ह्यात 6, बुलढाण्यात पाच, अमरावती जिल्ह्यात 7, एक अशा एकूण 126 संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, वाशीम, नागपूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू झाल्याचे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) वेगाने पसरत असला तरी, तो जनावरांमधून किंवा गाईच्या दुधाद्वारे मानवांमध्ये पसरत नाही. लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) संपूर्ण महाराष्ट्र राज्यात झपाट्याने पसरत आहे. हा गोवंशातील त्वचेचा विषाणूजन्य रोग आहे. हा आजार जनावरांमधून किंवा गाईच्या दुधाद्वारे माणसांमध्ये पसरत नाही.

आयएएस अधिकारी, सचिंद्र प्रताप सिंग यांनी सरकारच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात आवाहन केले आहे की, "रोगाचा प्रसार होत असला तरी, हा प्रसार फक्त गायी आणि बैलांपर्यंत मर्यादित आहे. तो प्राणीजन्य नाही. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशा अफवा पसरवल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. (हेही वाचा, Lumpy Virus: लम्‍पी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता)

प्रशासकीय अधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी, या आजारावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या खरेदीसाठी डीपीसीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) च्या लसीकरणकर्त्यांना आणि इंटर्नसाठी प्रति लसीकरण तीन रुपयांचे मानधन स्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.

सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी आणि खाजगी व्यावसायिकांनी MAFSU उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत. सर्व शेतकर्‍यांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही लक्षणांबद्दल जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्या / पशुधन विकास अधिकार्‍यांना कळवून त्यांच्या बाधित गुरांसाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत, असेही सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पशुसंवर्धन आयुक्त म्हणाले, "प्राणी अधिनियम, 2009 मधील संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रणाच्या कलम 4(1) नुसार, प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सांगितलेला अहवाल देणे बंधनकारक आहे. जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेला माहिती देण्यात यावी.