
Rare Human Case of Bird Flu in Texas: टेक्सासमधील (Texas) एका व्यक्तीला दुर्मिळ बर्ड फ्लूची (Bird Flu) लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा व्यक्ती संक्रमित गायींच्या संपर्कात होता, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. टेक्सासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, रुग्णाला अँटीव्हायरल औषधे दिली जात आहेत. त्यांनी सांगितले की या व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचे एकमेव लक्षण दिसून आले आहे ते म्हणजे त्याचे डोळे लाल होणे. फेडरल आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर सस्तन प्राण्यापासून बर्ड फ्लूच्या संसर्गाची ही पहिलीच घटना आहे.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे (CDC) प्रमुख उपसंचालक डॉ. नीरव शाह म्हणाले की, बर्ड फ्लूचा प्रसार एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये किंवा गुरांच्या दुधामुळे किंवा मांसामुळे कोणालाही संसर्ग झाल्याचा पुरावा नाही. असे हे पहिलेच प्रकरण असावे.
शहा म्हणाले की, चाचण्यांवरून हे सूचित होत नाही की हा विषाणू अधिक सहजपणे पसरत आहे किंवा हा अधिक गंभीर रोग होत आहे. सध्याची अँटीव्हायरल औषधे या रोगावर अजूनही प्रभावी आहेत. गेल्या आठवड्यात टेक्सास आणि कॅन्ससमध्ये गायींना बर्ड फ्लूची लागण झाल्याची माहिती शहा यांनी दिली. नंतर फेडरल कृषी अधिकाऱ्यांनी मिशिगन डेअरीमध्येही संक्रमणाची पुष्टी केली, जिथे टेक्सासमधून अलीकडे काही गायी आणल्या गेल्या होत्या. शेकडो बाधित गायींपैकी एकाही गायीचा मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Saree Cancer: भारतीय महिलांमध्ये वाढत साडी कर्करोगाचा धोका; जाणून घ्या काय आहे हा आजार व कशी घ्याल काळजी)
साधारण 2020 पासून, विविध देशांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू कुत्रे, मांजर, अस्वल आणि अगदी सील यांसारख्या प्राण्यांमध्ये पसरत आहे. हा बर्ड फ्लू विषाणू पहिल्यांदा 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये पसरला तेव्हा मानवांसाठी तो एक मोठा धोका म्हणून ओळखला गेला होता. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, गेल्या दोन दशकात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे 460 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक संक्रमित लोकांना हा संसर्ग थेट पक्ष्यांकडून झाला.