Saree Cancer: भारतीय महिलांमध्ये वाढत साडी कर्करोगाचा धोका; जाणून घ्या काय आहे हा आजार व कशी घ्याल काळजी
Saree Cancer (संग्रहित संपादित प्रतिमा)

Saree Cancer: साडी (Saree) हा भारतामधील महिलांचा मुख्य पोशाख आहे. आता केवळ भारतामध्येच नाही तर, परदेशातही साडी आवडीने परिधान केली जाते. मात्र साडी नेसल्यानेही कर्करोग (Saree Cancer) होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण ते खरे आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने साडी नेसत असाल, तर तुम्हाला कर्करोग होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (SCC) म्हणतात. अशी प्रकरणे फक्त भारतातच पाहायला मिळतात कारण आपल्या देशात बहुतेक महिला साडी नेसतात.

भारतातील अनेक भागांमध्ये स्त्रिया वर्षाचे 12 महिने आणि आठवड्याचे सातही दिवस साडी नेसतात. साडी नेसण्यासाठी आधी सुती पेटीकोट अथवा परकर कमरेला सुती धाग्याने घट्ट बांधतात. त्यानंतर त्यात साडी खोवली जाते. तर दिल्लीच्या पीएसआरआय हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. विवेक गुप्ता सांगतात की, जर एखाद्या महिलेने हा सुती धागा बराच काळ कमरेला बांधला, तर तो कंबरेला घासायला लागतो, ज्यामुळे तिथली त्वचा सोलून काळी पडू लागते. अशा परिस्थितीत साडी कर्करोगाचा धोका वाढतो.

याशिवाय या कॅन्सरच्या कारणांमध्ये पेहरावापेक्षा त्याची स्वच्छता अधिक जबाबदार आहे. सोबतच ज्या भागात जास्त उष्णता आणि आर्द्रता असते, तिथे हा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. बिहार आणि झारखंडमधून अजूनही त्याची प्रकरणे समोर येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये यावर संशोधन करण्यात आले आहे. संशोधनात केवळ साडीच नाही तर धोतराचाही समावेश करण्यात आला आहे.

साडी कॅन्सर हे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक केस समोर आल्यावर दिले होते. ज्यामध्ये 68 वर्षीय महिलेमध्ये कॅन्सर आढळून आला हो, जिथे ती महिला केवळ 13 वर्षांची असल्यापासून साडी नेसत असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कर्करोगाच्या प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणे साडीच्या कर्करोगाची आहेत.

दुसरीकडे, पुरुषांमध्ये टाइट आणि फिट जीन्स किंवा अशा कपड्यांमुळे कर्करोग होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तासन्तास घट्ट कपडे परिधान केल्याने शरीराला हानी होते. यामुळे, पुरुषांमध्ये पाठीच्या खालच्या भागात तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी होते आणि टेस्टिक्युलर कॅन्सर होऊ शकतो. मात्र, या संशोधनाचे ठोस निष्कर्ष येणे बाकी आहे. (हेही वाचा: Mumbai Sleep Scorecard Report: धक्कादायक! 32% मुंबईकर करत आहेत झोपेशी संबंधीत आजारांचा सामना; रात्री उशीरपर्यंत जागरण आरोग्यासाठी घातक)

अशी घ्या काळजी-

ज्या कापडामुळे त्वचेवर डाग पडतात असे कपडे घालणे टाळावे. तसेच घट्ट कपड्यांच्यामुळे त्वचा लाल होत असेल तर असे कपडे घालू नका.

याशिवाय घट्ट ब्रा, अंडरवेअर यांसारखे कपडे जास्त काळासाठी घालू नका. जिमसाठी देखील जास्त घट्ट कपडे घालणे टाळा.

(वरील माहिती इंटरनेट आधारीत आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांना भेटा)