तुम्हाला जर विविध प्रकारची आणि त्यातही प्राण्यांसारखी वेशभुषा करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक हटके नोकरी किंवा काम आहे. होय, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील शेतकऱ्यांकडे ही नोकरी उपलब्ध आहे. लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) जिल्ह्यातील काही गावांतील शेतकऱ्यांकडे हे काम उपलब्ध आहे. पण थांबा. नोकरीच्या मोहात पडण्यापूर्वी नोकरी नेमकी आहे तरी काय? ते जाणून घ्या. नाहीत उगाच अपेक्षाभंग व्हायला नको. तर मंडळी नोकरीबद्दल थोडक्यात सांगायचे तर. तुम्ही नोकरी किंवा हे काम स्वीकारले तर तुम्हाला दिवसभर अस्वलाचे कपडे घालून (Dressing Up as Bears ) उभे राहावे लागणार आहे. बोला आहात तयार? घ्या जाणून.
महत्त्वाचे म्हणजे अस्वलाचे कपडे घालून तुम्ही उभा राहणार असाल तर तुम्हाला ते काम फुकट नाही करावे लागणार. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लखीमपूरखेरी जिल्ह्यातील शेतकरी हे काम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला प्रतिदिन 250 रुपये देण्यास तयार आहेत. पण अस्वलाचा ड्रेस मात्र तुमचा तुम्हालाच खरेदी करावा लागणार आहे. अट इतकीच की त ड्रेस तुमच्या मापाचा असावा आणि तो परीधान केला तर तुम्ही अस्वल वाटायला हवे. बजरंग गड गावातील संजीव मिश्रा यांनी शाहजहांपूर येथून 5,000 रुपयांना “बेअर ड्रेस” विकत घेतला आहे.
लाखीमपूर खेरी परिसरातील लोक सांगतात. सध्याआम्हाला बऱ्यापैकी रोजगार मिळतो. शेतकरी शेतात पिके पिकवतो. पिक काढणीला यायच्या वेळी किंवा इतर वेळीही माकडे आणि बेवारस गाई-गुरे शेतात येतात. पिकांची नासधूस करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होतं. मग शेतकरी आम्हाला कामावर ठेवतो. आम्ही फक्त सामान्य कपडे घालून गेलो तर माकडे, गाई-गुरे घाबरत नाहीत. मग आम्ही अस्वलाचे कपडे घालून येतो. अस्वलाला गाई-गुरे आणि मागडे घाबरतात. आम्ही एका ठिकाणी उभे जरी राहिलो तरीही बऱ्याच अंतरावर गाई-गुरे आणि माकडे फिरकत नाहीत.
शेतकरीही सांगतात की, अस्वलांचे कपडे घालून कामगार उभे राहिल्यास भटकी जनावरे, प्राणी आणि माकडांचा उपद्रव होत नाही. कामगारांवर आमचे काही पैसे खर्च होता. परंतू, मोठे नुकसान टाळण्यासाठी छोटा-मोठा खर्च केव्हाही चांगला. या युक्तीमुळे किमान शेतीचे नुकसान तरी टळते.