Green Corridor For Heart | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिल्ली विमानतळावरुन निघालेले एक हृदय केवळ 11 मिनीटांमध्ये ऑल इंडिया इंस्‍टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस (All India Institute of Medical Sciences) अर्थातच एम्स (AIIMS) रुग्णालयात पोहोचले. मानवतेची झलक दर्शवणारी ही घटना दिल्ली (Delhi) येथे गुरुवारी (6 जानेवरी) दुपारी पाहायला मिळाली. या हृदयासाठी दिल्ली वाहतूक पोलिसानी ग्रीन कॉरिडोर (Green Corridor) उभारले. एका रुग्णासाठी चंडीगढ (Chandigarh) येथून हे हृदय दिल्लीला आणण्यात आले होते. जे दिल्ली विमानतळावरुन अवघ्या काही मिनीटांमध्ये रुग्णालयात पोहोचले आणि पुढील काहीच काळात त्याचा वापर रुग्णासाठी करण्यात आला.

दिल्ली वाहतूक पोलीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त विवेक किशोर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांना एम्सद्वारे पूर्वकल्पना मिळाली. चंडीगढ येथून एक जिवंत हृदय निघत आहे. इंडिगोच्या विमानाने हे हृदय दुपारी 1.40 मिनीटांनी दिल्ली विमानतळावर पोहोचणार आहे. हे हृदय कमीत कमी वेळात एम्स रुग्णालयात पोहोचवायचे आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलीस वाहतूक विभाग कामाला लागला. आईजीआय ट्रॅफीक सर्कलचे पोलीस इन्स्पेक्टर कुलदीप सिंह यांनी आवश्यक ती तयारी केली आणि ग्रीन कॉरिडोर उभारला.

दिल्ली विमानतळावर टर्मिनल-1 वर जिवंत हृदयाचे आगमन होताच पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर सुरु केला. सर्व अडथळे वेळीच दूर करत दिल्ली विमानतळापासून 11 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या एम्स रुग्णालयात हे हृदय केवळ 11 मिनीटात पोहोचले. दैनंदिन आणि सर्वसामान्यपणे दिल्ली विमानतळ ते एम्स हे अंतर पार करण्यासाठी साधारण 35 ते 40 मिनीटे लागतात. मात्र, ग्रीन कॉरिडॉरमुळे हे अंतर केवळ 11 मिनीटात पार झाले. (हेही वाचा, Green Corridor: फुफ्फुसाने एका तासात पार केले पुणे ते हैदराबाद अंतर, वाचवले एकाचे प्राण)

दरम्यान, या आधीही अनेकदा आवश्यक वेळी ग्रीन कॉरिडॉर घेण्यात आला आहे. अशाच एका ग्रीन कॉरिडॉरमुळे पुण्यातील एका रुग्णास हैदराबाद येथील व्यक्तीच्या हृदयामुळे जीवदान मिळाले होते. त्यासाठी हैदराबाद ते पुणे असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्या घटनेत रुग्णाने दान केलेल्या फुफ्फुसाने पुणे ते हैदराबाद (Pune-Hyderabad) असा प्रवास केला होता. त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी दाखवलेली समयसूचकता आणि ग्रीन कॉरिडोर ( Green Corridor) या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. हैदराबाद येथील केआयएमएस हार्ट अॅण्ड लंग्ज ट्रान्सप्लांट इन्स्टीट्यूट येथे एका रुग्णावर उपचार सुरु होते. हा व्यक्ती फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होता. या रुग्णाने तेलंगना सरकारच्या जीवदान योजने अंतर्गत नाव नोंदवले होते.