
Khandoba Yatra at Jejuri Fort: 'यळकोट यळकोट.. जय मल्हार' जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत आज बहुजनांचा कुलस्वामी असलेल्या जेजुरी खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाली. जेजुरी गडावर आज सोमवती यात्रा (Somvati Yatra) भरली आहे. त्यामुळे लाखो भाविकांनी आज गडावर हजेरी लावली आहे. आज (13 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता देवाचे मानकरी पेशवे, खोमणे माळवदकर यांनी सूचना केल्यानंतर श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा काढण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी गडावर होती. या सोहळ्यावेळी देवस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडत पालखीला सलामी देण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा होताच श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीची मुर्ती पालखीत विराजमना करण्यात आली. या वेळी भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधलण करण्यात आली.
खंडोबा पालखी कऱ्हा स्नानासाटी रवाना
सोमवती अमावस्या निमित्त जेजूरी गडावर सालाबादप्रामाणे यंदाही जेजुरी गडावर यात्रा भरली आहे. खंडोबा पालखी कऱ्हा स्नानासाठी घेऊन जाणे हा या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा आणि नेत्रदीपक घटक असतो. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भक्तजण गडावर जमतात. या वेळी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण होते. भंडाऱ्याची उधळण झाल्यावर गड पाहिल्यानंतर अनेकांना लक्षात येते की, तुझी सोन्याची जेजुरी असे का म्हटले जाते. दरम्यान, हा ऐतिहासिक पालखी सोहळा पायरी मार्ग उतरुन छत्री मंदिर मार्गे कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भक्त, सोहळ्याचे खांदेकरी, मानकरी, पुजारी आणि सेवक, विश्वस्त, ग्रामस्त उपस्थित असतात. याही वेळी ते उपस्थित होते.
खांदेकऱ्यांना ड्रेस कोड
दरम्यान, भाविकांची गर्दी, होणारी अनागोंदी आणि अनुचीत प्रकार टाळण्यासाठी अलिकडील काळात अतिशय नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येते. खास करुन पालखी सोहळ्यातील खांदेकऱ्यांना विशिष्ठ पोषाख (ड्रेस कोड) देण्यात आला आहे. ज्यामुळे सोहळ्याला एक प्रकारची शिस्तबद्धता प्राप्त झाली. सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
व्हिडिओ
खंडोबाची जेजुरी
जेजुरी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक मंदिराचे शहर आहे. खंडोबाच्या भक्तांसाठी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे शहर खंडोबाची जेजुरी मंदिरासाठी ओळखले जाते, जे राज्यातील सर्वात महत्त्वांच्या मंदिरांपैकी एक आहे. खंडोबाला मल्हारी, मार्तंड, म्हाळसाकांत आणि मैलारलिंग असेही म्हणतात. ते भगवान शिवाचे रूप आहे आणि महाराष्ट्रातील अनेक जाती आणि समुदायांद्वारे कुळ देव म्हणून पूजनीय आहे. खंडोबाला "जेजुरीचा देव" मानले जाते आणि धनगर लोक त्याला मोठ्या श्रद्धेने पाळतात.