Mucormycosis Disease: मुंबईत ‘म्युकरमायकोसिस’ च्या 111 रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती
Mucormycosis Disease (PC - Wikimedia Commons)

Mucormycosis Disease: कोरोना संसर्गातून बरे झालेल्यानंतर ‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) आजाराची लागण झालेल्या 111 रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली. काकाणी यांनी सांगितलं की, 38 रुग्णांवर नायर येथे उपचार सुरू आहेत, तर 34 रूग्णांवर केईएममध्ये, 32 रुग्णांवर सायनमध्ये आणि 7 रुग्णांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील अनेक रुग्ण हे मुंबईच्या बाहेरचे आहेत. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत म्युकरमाइकोसिस आजाराची माहिती मागितली होती. यावर आवाहन करतांना काकणी म्हणाले की, हा आजार बुरशीजन्य आहे. परंतु, हा संसर्गजन्य असल्याचे अद्याप उघड झालेले नाही.

कोविड इस्पितळातील डॉक्टरांना या आजाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा आजार रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली आहे. हा आजार होण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी, उपचार पद्धती, उपकरणे आणि औषधे या संदर्भात उपचार प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले आहेत. (वाचा - Mucormycosis Disease: ‘म्युकरमायकोसिस’ चे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार - Rajesh Tope)

काकाणी म्हणाले की, हा आजार रोखण्यासाठी सर्व रुग्णालयांना नियोजन व प्रतिबंधांची माहिती देण्यात आली आहे. आम्ही प्रोटोकॉलमध्ये नमूद केले आहे की, कोरोनाचा उपचार घेताना स्टिरॉइड्स / टॉसिलिझुमॅबचा वापर रुग्णावर जास्त प्रमाणात करु नये. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांची विशेष काळजी घेतली पाहिजे. बीएमसीने मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत 'एम्फो टेरेसीन बी' इंजेक्शन्स आणि म्युकरमाइकोसिस रोगाचा उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर औषधे खरेदी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. तोपर्यंत रुग्णालयांना स्थानिक खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, म्युकरमाइकोसिसअसलेल्या रूग्णांना 8 ते 12 आठवड्यांपर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्युकरमाइकोसिस हा एक पोस्ट कोविड आजार आहे. कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णात हा आजार आढळून येत आहे. ज्यामध्ये नाक, कान, घसा आणि डोळ्यावर गंभीर परिणाम होत आहेत.