Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रामधील कोरोना विषाणूची (Maharashtra Coronavirus) स्थिती अजूनही भयावह आहे. राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये मोठ्या महत्प्रयासाने सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडा फरक पडला असल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याबाबत सतत विरोधी पक्षाकडून आग्रह होताना दिसत आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. त्यामुळे आता मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केली आहे.

आपल्या पत्रात फडणवीस म्हणतात. ‘कोरोना चाचण्या सातत्याने नियंत्रित केल्या जात असल्याने दिवसेंदिवस स्थिती आणखी विदारक होत चालली आहे. देशातील सात राज्य 70 टक्के रूग्णांची भर घालत आहेत. त्यातील केवळ 3 राज्य 43 टक्के रूग्णांची भर घालत आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना सुद्धा आणि वारंवार आग्रह केला जात असताना सुद्धा चाचण्या अतिशय नियंत्रित पद्धतीने केल्या जात आहेत. प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्यांच्या यादीत महाराष्ट्र भारताच्या सरासरीपेक्षा खूप मागे आहे.’

देवेंद्र फडणवीस ट्वीट -

पुढे ते म्हणतात, ‘संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा विचार केला तरी महाराष्ट्राचा संसर्ग दर हा 18.44 टक्के आहे, तर मुंबईचा संसर्ग दर 13.63 टक्के आहे. असे असताना सुद्धा चाचण्यांवर लक्ष केंद्रीत न करणे, हे जिवघेणे ठरू शकते. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीला लवकर पूर्वपदावर आणायचे असेल तर अधिक संख्येने चाचण्यांना पर्याय नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या 6574 होती, ती 7709 वर गेली. ही वाढ केवळ 14 टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत 37,528 इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन 64,801 इतकी झाली. ही वाढ 42 टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात 18.44 टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक आहे. ज्या प्रमाणात राज्यातील चाचण्या वाढल्या, त्याच प्रमाणात मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे.’

पुढे त्यांनी काही आकडेवारी नमूद केली आहे- भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (1584), आंध्र (1391), दिल्ली (950), तामिळनाडू (847), आसाम (748), कर्नाटक (740), बिहार (650), तेलंगाणा (637), उत्तराखंड (590), हरयाणा (563) इतकी आहे. भारताची सरासरी 545 इतकी आहे.

देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांत सुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (4.18 टक्के), उत्तरप्रदेश (4.56 टक्के), पंजाब (4.69 टक्के), मध्यप्रदेश (4.74 टक्के), गुजरात (5.01 टक्के), बिहार (5.44 टक्के), हरयाणा (5.51 टक्के), ओरिसा (5.71 टक्के), झारखंड (6.19 टक्के), गोवा (8.05 टक्के), तामिळनाडू (8.10 टक्के), भारताचा 8.57 टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर 19.15 टक्के इतका आहे. (हेही वाचा: Corona Devi Mandir: सोलापुर मध्ये उभारलं कोरोना देवीचं मंंदिर, कोंंबड्या बकर्‍यांचा बळी देउन होतेय पुजा)

शेवटी, अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्‍यात खाटांची क्षमता अधिक वाढविणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून देणे, अशा सूचनांचा यात समावेश आहे.