Hingoli News: पुराच्या पावसाने इमारती, रस्ते, शेती पाण्याखाली गेल्याचे आपण पावसाळ्यात नेहमीच ऐकतो. पण हिंगोली जिल्ह्यात चक्क 12 लाख रुपये पाण्यात गेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि शिवेश्वर सहकारी बँक (Shiveshwar Nagri Sahkari Bank), जगद्गुरु पतसंस्थेच्या (Jagadguru Pat Sanstha) कार्यालयात पाणी घुसले. हे पाणी बँकेतील तिजोरीपर्यंत पोहोचले आणि चक्क 12 लाख 22 हजार रुपयांच्या नोटा भिजून काला झाल्या. या वेळी बँकेतील अनेक फाईल्स आणि महत्त्वाची कागदपत्रेही भिजली. ज्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणावर नुकासन झाले. हिंगोली जिल्ह्यात पाठिमागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी महापूरसदृश्य (Hingoli Flood New) स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात सर्वत्रच पाठीमागील चार पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यात काहीसा अधिकच मुसळधार आहे. त्यामुळे नदी-नाले, ओढे-ओहोळ आणि नद्यांनाही पूर आले आहेत. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरुन वाहात आहेत. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पूराचा तडाखा अधिक जाणवतो आहे. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावात अशाच प्रकारची स्थिती पाहायला मिळाली हिंगोलीतील आसना नदीला पूर आला. परिणामी पुराचे पाणी कुरुंदा गावात शिरले. हे पाणी एसबीआय, जगद्गुरु पतसंस्था आणि शिवेश्वर सहकारी बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचले. या पाण्यामुळे शिवेश्वर बँक आणि जगद्गुरु पतसंस्थेचे अनुक्रेमे 22 आणि 12 लाख रुपये पाण्यात भिजले. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: रत्नागिरीत पूराची चेतावणी देणारी अलर्ट यंत्रणा बसवली, 'अशाप्रकारे' मिळणार माहिती)
हिंगोली जिल्ह्यात 9 जुलैपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना पुर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे हिंगोलीत संततधार पाऊस कोसळतो आहे. इतका की पाठीमागील तीन दिवसांमध्ये हिंगोलीत सूर्यदर्शनच झाले नाही. मुसळधार पावसामुळे शेतीचे तर अगणीत नुकसान झाले आहे. किती हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्याला गणतीच नाही. कळमनुरी आणि वसमत तालुक्याला अतिवृष्टीचा फटका दुसऱ्यांदा बसला आहे.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पऊस पडत आहे. या पावसामुळे वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 13 दरवाजांपैकी 9 दरवाजे 70 सेंटीमीटरने तर चार दरवाजे 60 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाजांतून मिळून 1392 दलघमी क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो आहे. त्यामुळे धरणाखालील भागांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.