Hansraj Ahir Vs Balu Dhanorkar in Chandrapur Lok Sabha constituency | (Photo Credits: Facebook)

Lok Sabha Elections 2019: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency ) हा काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांसाठी समांतर कारणासाठी महत्त्वाचा आहे. ही दोन कारणं म्हणजे हा मतदारसंघ दोन्ही पक्षांसाठी बालेकिल्ला राहिला आहे. 1996 ते 98 हा अपवाद वगळता 1980 पासून थेट 2004 पर्यंत या मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडूण आला आहे. 2004 पासून मात्र, भाजपने विद्यमान केंद्रीय मंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांच्या रुपाने भाजपने हा मतदारसंघ खेचून घेतला. तेव्हापासून आज तागायत हा मतदारसंघ भाजपकडेच आहे. त्यामुळे समांतर विचार करु पाहता दोन्ही पक्षांसाठी हा मतदारसंघ बालेकिल्लाच राहिला आहे. आताही या मतदारसंघात थेट काँग्रेस विरुद्ध भाजप (Congress Vs BJP in Chandrapur) असाच सामना रंगणार आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा हंसराज अहिर यांनाच मैदानात उतरवले आहे. तर, काँग्रेस पक्षाने सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Suresh alias Balu Dhanorkar) यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे. अर्थात, बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) हे मुळचे काँग्रेसवासी नाहीत. आगोदर शिवसेना आणि पुढे पक्षांतर करुन काँग्रेस प्रवेश असा त्यांचा विद्यमान राजकीय प्रवास आहे. धानोरकरांचा हा प्रवासच मतदारसंघातील सामना अधिक अटीतटीचा करण्यास कारण ठरणार आहे. या चुरसीबद्दलच थोडेसे अधिक विस्ताराने.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत येण्याची कारणे

भाजपकडून लोकसभेच्या मैदानात केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उतरणार हे जवळपास नक्कीच होते. तसे घडलेही. आता उत्सुकता होती भाजपचा प्रबळ विरोधी पक्ष काँग्रेस इथे अहिरांच्या विरोधात कोणता उमेदवार देतो. उमेदवाराच्या नावावरुनच काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद झाले आणि हा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेला आला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षातून माजी खासदार नरेश पुगलिया आणि विजय वडेट्टिवार अशा दोन प्रबळ गटांत रस्सीखेच सुरू होती. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे बाळू धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. (धानोरकर यांच्या उमेदवारासीठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा अनुकुल होते, अशीराजकीय वर्तुळात चर्चा आहे.)

दरम्यान, काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे (Vinayak Bangade) यांच्या नावाची उमेदवारीसाठी थेट घोषणा केली. पक्षाचा हा निर्णय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना काही रुचला नाही. या पार्श्वभूमिवर 'माझं कुणी ऐकत नाही', असं वक्तव्य असलेली अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप (Ashok Chavan Audio Clip) महाराष्ट्रभर गाजली आणि काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारीबद्दलचा निर्णय बदलला. अखेर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांना काँग्रेची उमेदवारी जाहीर झाली. सुरुवातीला काँग्रेस पक्षाची उमेदवारी माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांनाच जाहीर झाली होती. मात्र, बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार आमच्या डोक्यावर का? असा सवाल स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्यामुळे त्यांनी स्वत:हूनच आपली उमेदवारी मागे घेतली. (हेही वाचा, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे; सामना रंगणार)

केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या जमेच्या बाजूचे

भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्यासाठी या निवडणुकीत काही जमेच्या बाजू आहेत. त्या म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या एकूण विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघावर भाजपचे प्रभुत्व आहे. तर, उर्वरीत एका मतदारसंगावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. अर्थात, शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी थेट काँग्रेसमध्येच प्रवेश करत लोकसभेसाठी उमेदवारी स्वीकारली आहे. हंसराज अहीर हे स्वत: मंत्री आहेत. तर, राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचा विधानसभा मतदारसंघसुद्धा याच लोकसभा मतदारसंघात येतो. आजवरचा निवडणुकी इतिहास पाहिला तर, मुंनगंटीवार आणि अहीर हा गट निवडणुकीत नेहमी एकत्र आला आहे. त्यामुळे अहिर यांची ताकद अधिक वाढते. भाजप सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढे करुन निवडणूक लढतो आहे. त्यामुळे मोदींच्या छबीचाही काहीसा फायदा अहिर यांना मिळू शकतो. (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल

Congress Vs BJP in Chandrapur

 

बेरेजेत असलेल्या अहिरांना काँग्रेसच्या धानोरकरांचे आव्हान

एकूण राजकीय स्थिती पाहिली तर, हंसराज अहिर यांचे पारडे बेरजेत आहे. परंतू, सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या उमेदवारीमुळे अहिर यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. अलिकडील काही काळात (2004 ते 2014) चंद्रपुर लोकसभा मतादरसंघात काँग्रेस पक्षाचे जाळे विस्कळीत झाली आहे. काँग्रेसची विस्कटलेली घडी आणि इतर पक्षांचे गट तट आणि त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात होणारी मतविभाजणी याचा फायदा अहिर यांना नेहमीच होत आला आहे. राजकीय विश्लेषक सांगतात की, आता स्थिती बदलली आहे. बाळू धानोरकर यांच्या रुपात काँग्रेसला तगडा उमेदवार मिळाला आहे. काँग्रेसमधील मरगळ झटकण्यास काँग्रेस बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. तसेच, मंत्री असूनही अहिर यांची विकासकामे फारशी समाधानकारक नाहीत. त्यामुळे अहिर यांना एँटीइन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो. (हेही वाचा, वर्धा लोकसभा मतदारसंघ: रामदास तडस विरुद्ध चारुलता टोकस सामना रंगणार; भाजप - काँग्रेस संघर्षात कोण मारणार बाजी?)

अधिक अधिक बरोबर वजा

2014 मध्ये लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये या मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकता अहिर धोक्यात असल्याचे जाणवते. उदा. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेमध्ये इथे आप उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली. आप उमेदवार वामनराव चटप आणि काँग्रेसचे संजय देवतळे यांनी प्रत्येकी 2 लाखांवर मतं मिळवली आहेत. आता लोकसभा निवडणुकीत आपचा उमेदवार नाही. त्यामुळे ही मते जर काँग्रेसच्या बाजून वळली तर, धानोरकरांचे पारडे जड ठरु शकते आणि अहिर अडचणीत येऊ शकतात, असे स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना वाटते. विश्लेषक सांगतात की, आप आणि काँग्रेस उमेदवारांची मते एकत्रीत करु पाहिल्यास अहिर यांना मिलालेल्या मतामध्ये केवळ 3 टक्क्यांचा फरक उरतो.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडूण गेलेले खासदार (1980 पासून पुढे)

Congress Vs BJP in Chandrapur Congress Vs BJP in Chandrapur

धानोरकर यांच्यासमोरील अडचणी आणि जमेच्या बाजू

सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी, त्यांचे स्वत:चाही लोकसंपर्क प्रभावी आहे. शिवसेना आमदार असतानाच्या काळात त्यांनी पक्षापलीकडे जात लोकसंपर्क वाढवला. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसमध्येही असलेली मरगळही झटकली गेली आहे. 2004 पासून अहिर यांच्या विरोधात एक तगडा उमेदवार मिळाल्याने अहिर विरोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण. त्याचाही फायदा धानोरकरांना होऊ शकतो. असे, असले तरी, लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील भाजपची ताकद पाहता धानोरकरांना अत्यंत नियोजनपूर्वक काम करावे लागणार आहे. गटातटात विखुरलेली काँग्रेस, अहिर विरोधकांची एकजूट आणि सर्वांना सोबत घेऊन त्यांना प्रवास करावा लागणार आहे. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचारप्रणालीला तोंड देत बुथपर्यंत पोहोचण्याचेही आव्हान धानोरकर यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे हे आव्हान कसे पेलते याकडे सर्वांचे लक्ष असणे स्वाभाविक आहे.