भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे; सामना रंगणार
NCP VS BJP in Bhandara–Gondiya Lok Sabha constituency | (Photo Credits-file photo)

Lok Sabha Elections 2019: भंडारा गोंदिया मतदासंघ (Bhandara–Gondiya Lok Sabha constituency) हा सध्या महाराष्ट्रातील तसा हाय होल्टेज मतदासंघ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)आणि काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्यामुळे हा मतदारसंघ नेहमी चर्चेत राहिला. तसे पाहायचे तर, भंडारा लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच जणू. थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1952 सालापासून इथून काँग्रस पक्ष किंवा त्या पक्षाला मानणारा उमेदवार निवडून आला आहे. अलिकडील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या मतदासंघात चांगला जम बसवला आहे. अपवाद फक्त १९८९,१९९९,२००४ आणि २०१४ या वर्षांत झालेल्या निवडणुकांचा. या वर्षात अनुक्रमे भाजपने बाजी मारत चार वेळा या मतदासंघावर आपला झेंडा फडकावला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सध्या काँग्रेसमध्ये असलेले नाना पटोले भाजपच्या तिकीटावर या मतदासंघातून निवडून गेले. मात्र, पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारविरोधत यल्गार पुकारत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे हा मतदारसंघ देशभरात चर्चेत आला. हा मतदासंघ वलयांकीत ठरला. आता या नाना पटोले हे काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर येथून रिंगणात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे (Nana Panchbudhe) विरुद्ध भाजपचे सुनील बाबूराव मेंढे (Sunil Mendhe) असा सामना रंगणार आहे. त्यामुळे उत्सुकता आहे ती, या मतदासंघात कोणता पक्ष बाजी मारणार. या मतदासंघाचा घेतलेला हा अल्पसा आढवा.

भंडारा गोंदिया मतदासंघ देशभरात चर्चेचा विषय

खरे म्हणजे हा मतदारसंघ हा जरी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र, 2014 मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेत काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्षही देशभरात भुईसपाट झाले. भंडारा गोंदिया मतदारसंघही याला अपवाद राहिला नाही. भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवून नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि तत्कालीन विमानोड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर आव्हान उभे केले. नाना पटोले विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. दरम्यान, नाना पटोले भाजचे खासदार झाले खरे. पण, त्यांचे आणि भाजपचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह आणि केंद्र सरकार यांच्याशीच पंगा घेतला. नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या अनेक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. थेट मोदी आणि शाह यांच्या विरोधात काही बोलण्याचे धाडस संपूर्ण कार्यकाळात (2014 ते 2019) खूपच कमी खासदारांनी दाखवले. हे धाडस दाखवणारे नाना पटोले हे पहिले खासदार होते. त्यामुळे नाना पटोले हे राष्ट्रीय प्रसारमाध्यमं आणि राजकारणातही चर्चित चेहरा ठरले. अल्पावधीत पटोले यांनी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले या चर्चित चेहऱ्यामुळे हा मतदासंघ देशभरात चर्चेचा विषय राहीला.

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

दरम्यान, नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली. या लढतीत भाजप उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला समोरी जात आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात हा मतदासंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. आताच्या निवडणुकीत विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट करत राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे यांना तिकीट दिले आहे. नाना पंचबुद्धे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीने या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.  (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं)

Sunil Mendhe and NCP Nana Panchbudhe | (Photo Credits-file photo)

राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप सामना

नाना पटोले हे या मतदारसंघातील उमेदवार नसल्यामुळे सामना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पंचबुद्धे विरुद्ध भाजप उमेदवार सुनील बाबूराव मेंढे यांच्यात होणार आहे. सुनील मेंढे हे तसे व्यापक पातळीवर राजकीय वर्तुळात चर्चेत नसलेले नाव आहे. तरीही भाजपने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे विरुद्ध सुनील मेंढे हा सामना कसा रंगतो हे पाहावे लागणार आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: नितीन गडकरी आज भरणार उमेदवारी अर्ज; नागपूर मध्ये भव्य रॅली (Watch Video))

मतदारसंघ भौगोलीक रचना

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची एकूण रचना पाहिली तर भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ हा 11 व्या क्रमांकावर येतो. भंडारा आणि गोंदिया अशा दोन जिल्ह्यातील एकूण तीन-तीन अशा विधानसभा मतदारसंघाचा या मतदारसंघात समावेश होता. त्यापैकी भंडारा जिल्हातील तुमसर विधानसभा मतदारसंघ, भंडारा विधानसभा मतदारसंघ, साकोली विधानसभा मतदारसंघ तर, गोंदिया जिल्ह्यातीलअर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ, तिरोडा विधानसभा मतदारसंघ, गोंदिया विधानसभा मतदारसंघ या तिन मतदारसंघाचा समावेश होतो.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ
भंडारा जिल्हा तुमसर विधानसभा मतदारसंघ
भंडारा विधानसभा मतदारसंघ
साकोली विधानसभा मतदारसंघ
गोंदिया जिल्हा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ
तिरोडा विधानसभा मतदारसंघ
गोंदिया विधानसभा मतदारसंघ

या मतदारसंघातील चर्चित खासदार

भंडारा गोंदिया मतदारसंगातून आतापर्यंत लक्ष्मणराव मानकर ( 1977), केशवराव पारधी, रामचंद्र हाजरणवीस, डॉ.खुशाल बोपचे(1989), चुन्नीलाल ठाकूर (1999), शिशुपाल पटले( 2004), नाना पटोले (2014), मधुकर कुकडे (2014 पोटनिवडणूक) या खासदारांनी या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले. तर, एकट्या प्रफुल्ल पटेल यांनी या मतदार संघातून प्रफुल्ल पटेल यांनी चार वेळा प्रतिनिधीत्व केले आहे.

सामाजिक समिकरण

या मतदारसंघातील निवडणुकीचा इतिहास पाहता सामाजिक, जातीय समिकरणाचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. कुणबी आणि पोवार समाजाचे प्राबल्य असलेला असा हा मतदासंघ आहे. हे दोन समाज ज्या उमेदवाराच्या पाठीशी तो उमेदवार या मतदारसंघात विजयी होणार हे नक्की, असे जणू समिकरण इथे पाहायला मिळते. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना हे सामाजिक समिकरण ध्यानात घेऊनच राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करत असल्याचे पाहायला मिळते.